'रिकी' 'पॉईंटआऊट', 'हसीचं' होणार का 'हसं'?

रिकी पॉन्टिंग आणि माइकल हसी या दोन दिग्गज बॅट्समनची बॅट पहिल्यासारखी तळपत नाही. म्हणूनच अनेकजण पॉन्टिंग आणि हसी यांच्या करियरचा आता अस्त सुरू झाल्याची टीका करत आहेत.

Updated: Dec 20, 2011, 07:01 AM IST

झी २४ तास वेब टीम

 

रिकी पॉन्टिंग आणि माइकल हसी या दोन दिग्गज बॅट्समनची बॅट पहिल्यासारखी तळपत नाही. म्हणूनच अनेकजण पॉन्टिंग आणि हसी यांच्या करियरचा आता अस्त सुरू झाल्याची टीका करत आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सीरिज सुरू होण्यापूर्वी या दोन दिग्गजांची ही स्थिती पाहता टीम इंडियाच्या गोटात मात्र आनंदाच वातावरण आहे. रिकी पॉन्टिंग आणि माइकल हसी ऑस्ट्रेलियाचे हे दोन दिग्गज बॅट्समन गेले काही दिवस आपल्या प्रतिभेला शोभेल अशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. यामुळेच आता या दोघांचेही करियर संपुष्टात आले असल्याची टीकेची झोड सध्या उठली आहे.

 

गेल्या वर्षभरातील पॉन्टिंग ६ टेस्टमध्ये २६.६३ च्या सरासरीने २९३ रन्सच करू शकला आहे. यामध्ये तो एकही सेंच्युरी झळकावू शकला नसून केवळ दोनच हाफ सेंच्युरी त्याने झळकावल्या आहेत. तर दोनवेळा तर त्याला आपलं खातदेखील उघडता आलेलं नाही. विशेष म्हणजे जानेवारी २०१० नंतर पॉन्टिंग एकही सेंच्युरी झळकावू शकलेला नाही हे विशेष. तर दुसरीकडे माइकल हसीने २०११ मध्ये ८ टेस्ट मध्ये ४२.२१ च्या सरासरीने ५९१ रन्स केल्या आहेत. यामध्ये दोन सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. पॉन्टिंगप्रमाणे हसीदेखील दोन वेळा आपलं खातदेखील उघडू शकलेला नाही. पॉन्टिंग आणि हसी यांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.

 

मात्र आता हेच दिग्गज बॅट्समन आता टीम इंडियासाठी ओझे झाल्याची ओरड अनेक क्रिकेट तज्ज्ञ करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन्सी पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पॉन्टिंगने तर कांगारूंना सलग दोनवेळा वर्ल्ड कप जिंकून देण्याची किमया केली आहे. मात्र आता टीममधील त्याचं स्थानच धोक्यात आल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तर 'मिस्टर क्रिकेट' अशी बिरूदावली मिरवणाऱ्या हसीची 'क्रिकेट' ही उपाधी आता पहिल्यासारखी झळाळती राहिलेली नाही अशीही ओरड होऊ लागली आहे. पॉन्टिंग आणि माइकल हसीची सध्याची सामान्य कामगिरी पाहता आता त्यांचा अस्त सुरू झाला आहे का? अशी चिंता त्याच्या चाहत्यांना वाटत आहे.