निलेश वाघ, मालेगाव : मुंबईची ड्रग पेडलर रुबिना नियाज शेख या महिलेला राज्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरातमधून अटक केली होती. तिच्या नावे मालेगाव व शहर परिसरात दोन कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे महिलेचे मालेगाव कनेक्शन आता समोर आले आहे. आधीच कुत्ता गोळीच्या आहारी मालेगावचे तरुण रुबिनाच्या माध्यमातून ड्रग्ज विळख्यात जाण्याची शक्यता आहे. रुबिनाच्या मालमत्तेमुळे मालेगावात एकच खळबळ उडाली आहे.
रुबिना ४० पेडलरच्या मदतीने ड्रग विक्री करत होती. मागील दहा वर्षांपासून या धंद्यात सक्रिय रुबिनाने सुमारे १२ कोटींची मालमत्ता जमविली आहे. मालेगाव शहरातील तिच्या मालमत्तेची किंमत दोन कोटींपेक्षा जास्त आहे.
सायने खुर्द येथे गट नंबर ४७/३४ या ५०० स्वेअर मीटर जागेचा सातबारा रुबिना नियाजू शेख या नावाने आहे. यासह तीन बंगले असल्याचे समजते. तीन महिन्यांपूर्वी तिने कुर्ला भागात ५० लाख रुपयांना दुकान खरेदी केल्याची माहिती आहे.
रुबिनाने मालेगाव शहरात का मालमत्ता खरेदी केली याचा तपास केला जात आहे. रुबिनाच्या अटकेमुळे तिची मालेगावीशी असलेली जवळीक समोर येणार असून ड्रग विक्रीचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या ती बांद्रा परिसरात राहत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या माहितीनुसार रुबिना ही महिला दुसऱ्याच्या हाताखाली काम करत असून मुख्य सुत्रधार असलेली महिलेच्या शोधात पथक आहे. मालेगावमध्ये तिचा विश्वासू साथीदार असण्याची शक्यता आहे. त्याद्वारे ती मालेगावमध्ये ड्रग्ज विक्री करण्यात असल्याची शक्यता आहे. रूबिनाचे ड्रग्ज रॅकेट शोधण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.