शिवसेनेने केला पुन्हा करेक्ट कार्यक्रम; भाजपच्या पाच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव महानगरपालिकेतील पाच भाजप नगरसेवकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केल्याने जळगावात पुन्हा भाजपला धक्का बसला आहे.

Updated: May 29, 2021, 08:45 PM IST
शिवसेनेने केला पुन्हा करेक्ट कार्यक्रम; भाजपच्या पाच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश title=

वाल्मिक जोशी, जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील पाच भाजप नगरसेवकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केल्याने जळगावात पुन्हा भाजपला धक्का बसला आहे. 

नुकताच मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीच्या 6 विद्यमान भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला व त्यानंतर आता जळगाव महानगरपालिकेतील पाच भाजपा नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्याने जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीच्या सहा भाजप नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्या पाठोपाठ आज पुन्हा जळगाव महानगरपालिकेतील 5 भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. आणखी पाच भाजपा नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे. 

जळगाव महानगरपालिकेत एकूण 74 नगरसेवक आहेत. यात भाजपचे 58 , शिवसेनेचे 13 व एम आय एम चे 3  होते व गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपाची एक हाती सत्ता ही जळगाव महानगर पालिकेवर होती . मात्र 18 मार्च रोजी भाजपच्या महापौर-उपमहापौर पदाचा कार्यकाळ संपल्याने भाजपचे नवे महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार घोषित होण्यापूर्वीच भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याने 18 मार्च रोजी महापौर उपमहापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यात   शिवसेनेने भाजपाकडून सत्ता खेचून जळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकवला. त्यामुळे गिरीश महाजन यांचे वर्चस्व असलेल्या व एकहाती सत्ता असलेल्या भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का दिला. 

त्याच दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर नगरपंचायतीचे सात विद्यमान भाजपा नगरसेवकांनी शिवबंधन हातात बांधल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यातच आता जळगावातील पाच भाजप नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केल्याने जळगावात शिवसेनेचे बळ वाढले आहे. 

जळगाव महानगर पालिकेत आताचे बला बल पाहता शिवसेनेचे 13 नगरसेवक तसेच 32 भाजप चे शिवसेनेत आलेले नगरसेवक असे एकूण 45 सदस्य संख्या शिवसेनेकडे आहे. तर आणखी 5 भाजपा नगरसेवक येणाऱ्या दिवसांमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हंटले असून त्यामुळे जळगावात येणाऱ्या काळात गावात महानगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता राहणार असल्याचा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.