अरविंद केजरीवाल 177 दिवसांनी तुरुंगाबाहेर म्हणाले 'खरा आहे म्हणून देवाने साथ दिली'

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना जामीन देण्यात आला. तब्बल 177 दिवसांनी अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर आले आहेत. 

| Sep 13, 2024, 21:00 PM IST
1/8

अरविंद केजरीवाल 177 दिवसांनी तुरुंगाबाहेर म्हणाले 'खरा आहे म्हणून देवाने साथ दिली'

2/8

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल दिल्लीतील तुरुंगात होते. मद्य घोटाळ्यात सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यातही केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलाय.

3/8

१० लाख रुपयांच्या जात मुचालक्यावर केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. केजरीवालांना जामीन मंजूर होताच दिल्लीत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवून आपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

4/8

कथित मद्य घोटाळ्यात गेल्या 177 दिवसांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात होते. 10 मे ते 2 जूनदरम्यान अरविंद केजरीवाल पॅरोलवर तुरुंगाच्याबाहेर होते. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी केजरीवालांनी पॅरोलचा अर्ज केला होता. आता सुप्रीम कोर्टानं जामीन देताना केजरीवाल यांना काही अटी घातल्या आहेत.

5/8

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही. शिवाय ते सचिवालयातही जाऊ शकणार नाहीत. आवश्यक असल्याशिवाय कोणत्याही सरकारी फाइलवर स्वाक्षरी करता येणार नाही. खटल्याबाबत कोणतेही सार्वजनिक विधान किंवा टिप्पणी करता येणार नाही.

6/8

याशिवाय कोणत्याही साक्षीदाराशी कोणत्याही प्रकारे बोलता येणार नाही. या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अधिकृत फाइलमध्ये हस्तक्षेप नसेल. गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करावं लागेल अशा अटी घालण्यात आल्या आहेत. 

7/8

अरविंद केजरीवालांना दिलासा मिळताच शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. केजरीवालांना मिळालेल्या जामिनातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसांचा लढा आज सत्याच्या मार्गानं निघाला आहे. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली, असं ट्विट शरद पवारांनी केलंय.

8/8

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात केजरीवाल आक्रमकपणे मैदानात कसे उतरणार हे पाहणं महत्त्वाचंय.