पहिल्याच पावसात पालिकेची पोलखोल, ठिकठिकाणी पाणी तुंबले

 मुंबईतील अनेक ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली आहे.

Jun 28, 2019, 13:42 PM IST

मुंबई : दिर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्याच दिवशी शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सकाळी नऊ वाजल्यानंतर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रेल्वेवरही पहिल्या पावसाचा परिणाम होताना दिसत आहे. परिणामी पहिल्याच पावसात मुंबई पालिकेची पोलखोल झाली आहे. 

1/5

उन्हाच्या कडाक्यानंतर वातारणातील गारवा मुंबईकरांना अनुभवायला मिळत आहे. मुंबईचे तपमान २७ डिग्रीच्या आसपास पोहोचले आहे. पावसाचा आनंद असला तरी मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

2/5

अंधेरी, धारावी, वसई, कांदिवली, बोरिवली त्याचप्रमाणे जवळपासच्या अनेक भागांमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून गटारांवरील 'मॅनहोल' न उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

3/5

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तब्बल अर्धा तास उशिराने गाड्या धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. 

4/5

गुरूवारी मुंबईत पाऊस दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून दर्शवण्यात आला होता. पुढील ४८ तास जोरदार पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

5/5

अलीबाग, कोल्हापूर, मुंबई उपनगर, नागपूर, पालघर, रायगड, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, आणि ठाणे या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.