Ganesh Jayanti 2023: पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुध्द चतुर्थी. यंदा 25 जानेवारीला बुधवारी माघी गणेश जयंती साजरी केली जाईल. आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाप्पा! त्याला आपण अनेक नावांनी ओळखतो. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्नविनायक, विनायक, धुमकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन अशी 12 नावे आहे. त्याच्या प्रत्येक नावामागे एक आख्यायिका आहे. इथे आपण त्यांच्या जन्मकथांबद्दल जाणून घेऊया...
फार पूर्वी अंगद देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मणला शारदा नावाची सुविद्य आणि सुशिल पत्नी होती. त्यांचा संसार सुखात सुरू होता, मात्र त्यांना संतानप्राप्ती होत नव्हती. त्यानंतर त्यांनी देवाची करुणा भाकली अन् त्यांना एक सोडून दोन पूत्रांचे दान प्राप्त झाले. त्या जुळ्या मुलांचे देवांतक आणि नरांतक अशी नावे देण्यात आली.
ही दोन्ही जुळे मुले मोठी झाल्यानंतर त्यांनी महर्षी नारद यांची भेट घेतली. त्यांनी दोन्ही मुलांचे भाकित वर्तवले. ते रुद्रकेतूला म्हणाले, 'तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही महापराक्रमी होतील. परंतु, त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर केला तर त्यांचा विनाश देखील होईल. त्यांना सद्बुद्धी लाभावी, म्हणून देवाधिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा.
त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले. त्या दोघांची भक्ती पाहून महादेव त्यांना प्रसन्न झाले. त्यावर महादेवांनी त्यांना वर मागायला सांगितला. साक्षात देव प्रसन्न झालेत पाहून दोघांची मती फिरली. आणि महादेवांकडे मागितले, 'आम्हाला अमरत्व द्या.' भगवान म्हणाले, 'मृत्यूलोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच. अमरत्त्वाचा आशीर्वाद मी देऊ शकत नाही. दुसरे काही हवे असेल, तर मागा.' मुले हुशार होती. ती म्हणाली, 'देवा, आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे. त्रैलोक्यीचा राज्यकारभार चालवायचा आहे. जगावर सत्ता मिळवायची आहे.' लहान मुलांची मोठी स्वप्ने पाहून देव तथास्तू म्हणाले आणि अंतर्धान पावले.
त्या दोघांना महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यापासून दोघेही उन्मत्त झाली. सत्शील दांपत्याच्या उदरी पापबुद्धीची बालके कशी जन्माला आली, याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले. तोवर या बालकांनी समविचारी, पराक्रमी, दुष्ट वृत्तीची फौज तयार केली आणि स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकावर अतिक्रमण केले. त्यांनी लोकांचा छळ सुरू केला. त्याचबरोबर देवही त्यांच्या भीतीने चळचळा कापू लागले. ते महादेवांना शरण आले. परंतु, या मुलांना महादेवांनीच आशीर्वाद दिला म्हटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. म्हणून त्रिदेव, समस्त ऋषी आणि देवगणासह गणरायाला शरण केले. त्यानेच आपल्या चतुर बुद्धीने यातून मार्ग काढावा, अशी प्रार्थना केली.
देवांतक आणि नरांतकाला देव, दानव आणि मानव यांच्यापासून अभय होते. म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचे शीर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी, देवमाता अदिती हिच्या उदरी जन्म घेईन असा शब्द दिला.
महर्षी नारदांनी ही वार्ता कश्यप ऋषींना जाऊन सांगितली. त्रिभुवनपालक गणपती आपल्या घरात जन्म घेणार या विचाराने दोघेही आनंदून गेले. त्यांनी गणरायाची आराधना सुरू केली अन् अदिती माता गर्भवती राहिली. त्यानंतर माघ शुक्ल चतुर्थीला दुपारच्या वेळी अदिती मातेच्या पोटी उदरी जन्म घेतला. गणरायाचे साजिरे गोजिरे बालरूप पाहून स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सर्व नद्या आणि देवस्त्रिया वेषांतर करून बाळाला न्हाणी घालण्यासाठी आल्या. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत बाळाचा नामकरण सोहळा पार पडला.
देव, ऋषीमुनी, मानव या सर्वांच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला, म्हणून बालकाचे नाव 'महोत्कट' ठेवण्यात आले. सर्व देवतांनी आपल्याकडील शक्ती, आयुधे यांचे वरदान महोत्कटाला आशीर्वादस्वरूपात दिले. कालांतराने याच महोत्कटाने देवांतक आणि नरांतकाचा वध केला आणि त्रैलोक्याला भयमुक्त केले.