संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला महत्त्व, पण विनायक चतुर्थीला का नाही? जाणून घ्या

 शुल्क पक्षातील चतुर्थीला विनायकी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी म्हटलं जातं.

Updated: Jun 20, 2022, 03:52 PM IST
संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला महत्त्व, पण विनायक चतुर्थीला का नाही?  जाणून घ्या title=

Chandra Darshan Significance On Chaturthi: हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात पंधरवडा असतो. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असा पंधरवडा असतो. शुल्क पक्षातील चतुर्थीला विनायकी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी म्हटलं जातं.  चतुर्थी ही गणेशाला समर्पित आहे. या दिवशी श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळावा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी उपवास केला जातो. गणेशजींच्या आशीर्वादाने माणसाचे सर्व अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थी व्रत प्रत्येक कृष्ण पक्षात पाळले जाते. या दिवशी चंद्र पाहूनच व्रत सोडले जाते. पण विनायक चतुर्थी म्हणजेच शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करण्यास मनाई आहे. जाणून घेऊयात यामागचे कारण...

संकष्टी चतुर्थीला चंद्र दर्शनाचे महत्त्व

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत ठेवले जाते. या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी चंद्रदर्शन झाल्यावरच उपवास सोडला जातो. चंद्रदर्शनानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण केले जाते आणि त्यानंतरच व्रताचे पूर्ण फळ मिळते आणि व्रत पूर्ण मानले जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात.

विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन करत नाही

संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही. तसेच विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध आहे. शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला अनेक लोक उपवास करतात आणि चंद्रदर्शन करत नाही. असे मानले जाते की, भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला चंद्रदर्शन केल्यास माणसावर खोटा कलंक लागतो. या चतुर्थीला भगवान श्रीकृष्णाने चंद्र पाहिला होता अशी पौराणिक मान्यता आहे. यानंतरच त्यांच्यावर मणी चोरीचा खोटा आरोप करण्यात आला होता. म्हणून शुक्ल पक्षातील चतुर्थीला चंद्रदर्शन करण्यास मनाई आहे. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)