What is Panchak In Marathi : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला 'पंचक' (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) हा आगळावेगळा मराठी चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जानेवारी 2024 ला पंचक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या नावाने प्रत्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंदू धर्मात पंचकला विशेष महत्त्व आहे. पंचक काळात शुभ कार्यावर बंदी असते. नेमकं हे पंचक म्हणजे काय रे बुवा...याच प्रश्नाचं उत्तर वैदिक ज्योतिषशास्त्रात काय सांगण्यात आलं आहे ते जाणून घेऊयात.
पुराणातील काही उल्लेखांनुसार, रामायण काळात श्रीरामांनी रावणाचा वध केला तो काळ हा पंचकाचा होता, अशी मान्यता आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला होणं अशुभ मानलं जातं. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर पुढील काळात कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असतं, असा दावा शास्त्रात करण्यात आला आहे.
शास्त्रानुसार पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक असं म्हटलं जातं. चंद्राचं धनिष्ठा नक्षत्राचं तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधी हा पंचक म्हणून ओळखला जातो. या काळात शुभ कार्य केले जात नाही. प्रत्येक महिन्यात पाच दिवस हा पंचक काल असतो.
खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून 360 अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या 300 डिग्री ते 360 डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक म्हटलं जातं. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव पडतो अशी त्यांचा समज आहे.
पंचक काळात लाकडाची खरेदी करायची नसते. घराच्या छताच्या दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम सुरु करायचा नसतें. त्याशिवाय कुठल्याही प्रकारचा पलंग विकत घेणे किंवा बनवणे, बेड खरेदी करणे किंवा बेडचे दान या गोष्टी करायच्या नसतात. पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानलं गेलं आहे. कोणात्याही प्रकारच्या इंधनाचं भंडारण करू नये, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे.
पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ नसतं, तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ असल्याचं ज्योतिषशास्त्रात मानलं गेलं आहे. या काळात यात्रा करणे, मुंडन कार्य, व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानलं जातं. तसंच साखरपुडा समारोह, विवाह आदी शुभ कार्ये पंचक काळात तुम्ही करु शकता. पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्यांचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतो. काहीवेळा धनलाभाचं योगही प्रबळ होतात. याशिवाय वाहन खरेदी, गृह प्रवेश, शांती पूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्ये करणे पंचक काळात शुभ मानले जातात.
ज्योतिषानुसार, सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा वेगवेगळा असतो. पंचक कोणत्या दिवशी लागतं, यावर त्याचा प्रभाव आणि त्याचे प्रकार ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. पंचकची सुरुवात रविवारी होत असले तर त्याला रोग पंचक म्हणतात. पंचक सोमवारी सुरू होणार असले राज पंचक, मंगळवारी येणारं अग्नी पंचक म्हटलं जातं. तर बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक संबोधलं जातं. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकला चोर पंचक म्हणतात. शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटलं गेलं आहे.
पंचक काळात मृत्यू हे अशुभ मानले गेले आहे. पंचक कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या जीवितहानीची धोका असते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. पंचक दोष लागू नये, यासाठी काही उपायही शास्त्रात सांगण्यात आले आहेत. पंचक कालावधीत कोणाचा मृत्यू झाला, तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्यांच्या अंतिम संस्कार करताना दर्भाचं एक प्रतीक तयार करून त्याचा दाहसंस्कार मृतकासोबत करण्याचं विधी आहे. तर गरुड पुराणानुसार पंचकमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पिठाच्या कणकेच्या बनवलेल्या पाच पुतळ्या मृतदेहासोबत सरणावर ठेवाव्यात आणि या पाच मृतदेहांचं पूर्ण विधीपूर्वक अंत्यसंस्कार करून पंचक दोष मुक्त करण्यात येतो.
पंचक काळ - 13 जानेवारी 2024 शनिवार रात्री 11:35 वाजेपासून 18 जानेवारी 2024 गुरुवारी दुपारी 03:33 वाजेपर्यंत असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)