७ लाखांचं हॉटेल बिल दाखवणारा आकाश चोप्रा ट्रोल

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी चमकदार कामगिरी दाखवता आली नाही.

Updated: Jul 19, 2018, 05:11 PM IST
७ लाखांचं हॉटेल बिल दाखवणारा आकाश चोप्रा ट्रोल

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. पण आता कॉमेंट्री करताना आकाश चोप्रा बराच लोकप्रिय झाला आहे. सोशल नेटवर्किंगवरही आकाश चोप्रा बराच अॅक्टीव्ह असतो. पण याच सोशल नेटवर्किंगवर केलेल्या एका पोस्टमुळे आकाश चोप्रा चांगलाच ट्रोल झाला आहे. आकाश चोप्रानं त्याच्या इंडोनेशिया दौऱ्याचा एक अनुभव ट्विटरवर शेअर केला. या ट्विटमध्ये आकाश चोप्रानं इंडोनेशियामधल्या एका हॉटेलच्या बिलाचा फोटो पोस्ट केला. हे बिल तब्बल ७ लाख रुपयांचं होतं. एका जेवणासाठी ७ लाख रुपये खर्च केले. इंडोनेशियामध्ये स्वागत, असं ट्विट आकाश चोप्रानं केलं होतं.

म्हणून आकाश चोप्रा झाला ट्रोल

आकाश चोप्रानं हे ट्विट केल्यानंतर लगेचच त्याला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल करण्यात आलं. इंडोनेशियामध्ये हॉटेलचं बिल ७ लाख रुपये जरी झालं असलं तरी भारतीय चलनानुसार ही किंमत ३,३५० रुपये एवढी होते. भारताचा एक रुपया म्हणजे इंडोनेशियाचे २१० रुपये होतात. यूजर्सनी यावरूनच आकाश चोप्राला सुनावलं. अखेर आकाश चोप्रानंही मान्य केलं की हीच योग्य किंमत आहे.