'हार्दिकवर शंका घेणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनो...'; डिव्हिलियर्स स्पष्टच बोलला

AB de Villiers Takes Dig At Hardik Pandya Critics: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. हार्दिक बार्बाडोसच्या मैदानावर रडत होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 7, 2024, 08:14 PM IST
'हार्दिकवर शंका घेणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनो...'; डिव्हिलियर्स स्पष्टच बोलला title=
युट्यूबवर बोलताना व्यक्त केल्या भावना

AB de Villiers Takes Dig At Hardik Pandya Critics: तारीख - 29 जून 2024... स्थळ - बार्बाडोसचं मैदान... वेळ - भारतीय वेळेनुसार साधारण रात्री सव्वा अकराच्या सुमारास... अर्शदीप सिंगने 20 व्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकला आणि भारताने टी-20 वर्ल्ड कप 2024 वर आपलं नाव कोरलं. शेवटचा बॉल टाकल्यानंतर पुढल्या क्षणी कर्णधार रोहित शर्माबरोबरच हार्दिक पांड्या आणि इतरही खेळाडू भावूक होऊन मैदानावर उभ्या जागी बसले. हार्दिकच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू कॅमेराच्या नजरेतून सुटले नाहीत. मागील काही महिन्यांपासून सातत्याने टीकेचा धनी ठरत असलेल्या हार्दिकच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. एप्रिल आणि मेच्या महिन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांकडून मुंबईच्या मैदानावरही हार्दिकची हुर्यो उडवण्यात आली होती. त्याच हार्दिकने भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देताना मोलाची कामगिरी केली. हार्दिकने अंतिम सामन्यामध्ये 4 ओव्हर टाकत 20 धावांच्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेच्या 3 गड्यांना तंबूत पाठवलं. हार्दिकने टी-20 वर्ल्डकपच्या 8 सामन्यामध्ये 144 धावा देत एकूण 11 विकेट्स घेतल्या.

डिव्हिलियर्सकडून हार्दिकचं कौतुक

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकन चाहत्यांची निराशा केली. मात्र असं असतानाच भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला मिस्टर 360 डिग्री म्हणजेच ए. बी. डिव्हिलियर्सने हार्दिक पंड्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्तरावर हार्दिकने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करुन दाखवल्याचं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर समालोचकांशी बोलताना हार्दिक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी हार्दिकने मागील काही महिन्यांमध्ये त्याला काय काय सोसावं लागलं यासंदर्भातील वक्तव्य केलं. डिव्हिलियर्सने याच विधानाचा संदर्भ देत हार्दिकने त्याच्यावर शंका घेणाऱ्या सर्वांना थेट उत्तर दिल्याचं म्हणत या अष्टपैलू खेळाडूचं कौतुक केलं आहे.

'कर्णधाराने त्याच्याकडे बॉल दिला म्हणाले...'

"मला अशा मोठ्या आणि मौक्याच्या क्षणी कोणता खेळाडू संघासाठी उभा राहतो हे महत्त्वाचं वाटतं. मुंबई इंडियन्सबरोबर असताना रोलर कोस्टर राईडप्रमाणे चढ उतार पाहिलेल्या हार्दिक पांड्याकडेच पाहा. गुजरातकडून तो मुंबईमध्ये आला आणि त्याला टीकेचा समाना करावा लागला. मात्र तो टिकून राहिला त्यामुळेच टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला गोलंदाजीची संधी दिली. खरं तर तो क्षण त्याचा होता. तो क्षण म्हणजे, "आता सगळे भारतीय क्रिकेट चाहते तुझ्याकडे नजरा लावून आहेत. त्यामुळेच आता मी क्रिकेटर म्हणून या क्षणी सर्वोत्तम खेळण गरजेचं आहे," असा होता," असं डिव्हिलियर्स युट्यूब चॅनेलवर म्हणाला.

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या उल्लेख...

"सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कामगिरी त्याने (हार्दिकने) केली. त्याने अशा पद्धतीने यशस्वी व्हावं हे असं मला (एक दक्षिण आफ्रिकन म्हणून) वाटत नव्हतं. मात्र जेव्हा मी त्या क्षणांकडे पाहतो तेव्हा त्याच्याबद्दल मला फार आदर वाटतो. तो मोठ्या सामन्यांमध्ये खेळणारा मोठा खेळाडू आहे. त्यासाठीच तो क्रिकेट खेळतो असं मला वाटतं. त्याच्यावर शंका घेणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सर्व चाहत्यांनो मला खात्री आहे की आता त्याने भविष्यासाठी तुमच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं आहे," असंही डिव्हिलियर्स म्हणाला. 

हार्दिक पहिलाच खेळाडू ज्याने...

टी-20 वर्ल्ड कपमधील दमदार कामगिरीच्या जोरावर हार्दिक पंड्याने टी-20 रॅकिंगमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. अशाप्रकारची कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.