ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पी व्ही सिंधू हिला THAR भेट देण्याची मागणी, आनंद महिंद्रा यांनी दिले भन्नाट उत्तर

भारताची महान बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. 

Updated: Aug 3, 2021, 07:47 AM IST
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पी व्ही सिंधू हिला THAR भेट देण्याची मागणी, आनंद महिंद्रा यांनी दिले भन्नाट उत्तर

 मुंबई : भारताची महान बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. पीव्ही सिंधू हिने यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. पी व्ही सिंधू वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यानंतर समाज माध्यमांतून तिला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी चांगल्या कामगिरीबद्दल THAR ही गाडी भेट म्हणून द्यावी, अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी युजर्सला असे काही उत्तर दिले की त्याची बोलतीच बंद झाली.

सिंधू हिला THAR भेट देण्याची मागणी

पी व्ही सिंधूहिने पदक जिंकल्यानंतर तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दरम्यान, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले, 'जर मानसिक ताकदीचे ऑलिम्पिक असते तर सिंधू अव्वल स्थानावर आली असती. निराशाजनक पराभवानंतर आणि जिंकल्यानंतर तिने किती निर्धाराने खेळ खेळला याचा विचार करा.

 
आनंद महिंद्रा यांनी दिले भन्नाट उत्तर

आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावरील युजर्स सिंधूसाठी THAR कारची मागणी करत आहेत. त्यावर, आनंद महिंद्राने अतिशय मजेदार पद्धतीने लिहिले, 'त्याआधीच सिंधूला THAR कार देण्यात आली असून ती गॅरेजमध्ये पार्क करण्यात आलेली नाही. या उत्तरानंतर युजर्सची बोलतीच बंद झाली आहे.

 सिंधूने इतिहास रचला

पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कांस्यपदक पटकावले आहे. सिंधूने चीनच्या बिंगजियाओचा 21-13, 21-15 असा पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरले. पी व्ही सिंधू वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. पुरुषांमध्ये, कुस्तीपटू सुशील कुमार याने (कांस्य - बीजिंग 2008, रौप्य - लंडन 2012)  हा पराक्रम केला आहे.