सुतार ते टीमला वर्ल्डकप फायनलपर्यंत पोहोचवण्याचा प्रेरणादायी प्रवास!

जेव्हा संघातून वगळण्यात आलं तेव्हा त्याने सुतार म्हणून काम करायला सुरुवात केली.

Updated: Nov 14, 2021, 04:01 PM IST
सुतार ते टीमला वर्ल्डकप फायनलपर्यंत पोहोचवण्याचा प्रेरणादायी प्रवास! title=

दुबई : ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेडची चर्चा आज प्रत्येक क्रिकेट चाहत्यामध्ये आहे. ऑस्ट्रेलियाला T-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत नेण्यात वेडने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र फार कमी लोकांना हे माहिती असेल की 4 वर्षांपूर्वी जेव्हा वेडला संघातून वगळण्यात आलं तेव्हा त्याने सुतार म्हणून काम करायला सुरुवात केली.

दुबईत पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वेडने 17 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. त्याने डावाच्या 19व्या ओवरमध्ये सलग 3 सिक्स ठोकून संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं आणि पाकिस्तानला या वर्ल्डकपमधून बाहेर केलं.

याआधी मॅथ्यू वेडचा T-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात समावेश होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. त्यालाही संधी मिळाली आणि त्याने स्वत:ला सिद्ध केलं. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने एका क्षणी 96 धावांपर्यंत 5 विकेट गमावल्या होत्या. पण वेड आणि मार्कस स्टॉइनिस यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 1 ओव्हर बाकी असताना विजय मिळवून दिला.

वेडने आपली क्षमता सिद्ध केली आणि एक चांगलं फिनिश दिलं. हे जाणून आश्चर्य वाटेल की मॅथ्यू वेडच्या कारकिर्दीत एक टर्निंग पॉईंट आला जेव्हा त्याला ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आलं. मात्र उदरनिर्वाहासाठी त्याला सुतार बनावं लागलं. मॅथ्यू वेडने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्व आशा गमावल्या होत्या आणि त्याला असं वाटत होतं की सर्वकाही संपलं होतं.

2017-18 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला वगळण्यात आलं. तो म्हणाला की, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघातून वगळल्यानंतर त्याला वाटलं की, आपली क्रिकेट कारकीर्द संपली आहे. तो तस्मानिया इथल्या आपल्या घरी परतला आणि सुतार म्हणून काम करू लागला.

33 वर्षीय वेडने आतापर्यंत 36 कसोटी, 97 वनडे आणि 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 4 शतके आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 1613 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 1867 धावा केल्या आहेत. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एकूण 3 अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याच्या नावावर 729 धावा आहेत.