मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या टीममध्ये एन्ट्री झाली आहे. अंडर-२३ कर्नल सीके नायडू ट्रॉफीच्या क्वार्टरफायनलसाठी अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान हा सामना रंगणार आहे. अर्जुन तेंडुलकरबरोबर या टीममद्ये यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान या खेळाडूंचाही समावेश आहे.
अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये यशस्वी जयस्वालने उत्कृष्ट कामगिरी केली. जयस्वालने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत १३० पेक्षा जास्तच्या सरासरीने ४०० रन केले. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्डही जयस्वालच्या नावावर आहे. पाकिस्तानविरुद्ध सेमी फायनलमध्ये जयस्वालने शतक केलं, तर फायनलमध्ये त्याने अर्धशतकी खेळी केली. त्याआधी २०१९ साली यशस्वीने लिस्ट-ए कारिकिर्दीमध्ये द्विशतक केलं. सगळ्यात कमी वयात द्विशतक करण्याचा विक्रमही जयस्वालने केला.
दुसरीकडे सरफराजसाठीही हे वर्ष स्वप्नवत असंच आहे. २०१९-२० या रणजी मोसमात मुंबईला नॉक-आऊटमध्ये प्रवेश मिळवता आला नसला, तरी सरफराजने ६ मॅचमझ्ये १५४.६६च्या सरासरीने ९२८ रन केले. सरफराजने उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद ३०१ रन केले. यानंतर लगेच पुढच्याच मॅचमध्ये त्याने हिमाचल प्रदेशविरुद्ध नाबाद २२६ रनची खेळी केली. मध्य प्रदेशविरुद्धही सरफराजने १७७ रन केले.
अर्जुन तेंडुलकर याने २०१८ साली श्रीलंकेविरुद्ध अंडर-१९मधून पदार्पण केलं. मागच्यावर्षी मुंबईने अर्जुनची बापुना कपसाठीच्या १५ सदस्यीय टीममध्ये निवड केली. अर्जुन तेंडुलकरने अजून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं नाही.
मुंबईची टीम
हार्दिक तामोरे (कर्णधार), अमन खान, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, अग्नी चोप्रा, चिन्मय सुतार, गौरीश जाधव, वैभव कलमकर, श्रेयश गुरव, तनुष कोटियन, मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अंजदीप लाड, प्रशांत सोळंकी, साईराज पाटील