२०११ वर्ल्डकपची फायनल मॅच फिक्स होती, रणतुंगांचा आरोप

श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या एका विधानाने क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडालीये. २०११च्या वर्ल्डकपमधील फायनल मॅच फिक्स होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केलीये. 

Updated: Jul 14, 2017, 06:56 PM IST
२०११ वर्ल्डकपची फायनल मॅच फिक्स होती, रणतुंगांचा आरोप title=

नवी दिल्ली : श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या एका विधानाने क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडालीये. २०११च्या वर्ल्डकपमधील फायनल मॅच फिक्स होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केलीये. 

५३ वर्षीय रणतुंगा यांनी फेसबुकवर याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केलाय. यात त्यांनी वर्ल्डकपची फायनल मॅच फिक्स होती असा आरोप केलाय. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची त्यांनी मागणी केलीये. 

२०११च्या वर्ल्डकप फायनलच्यावेळी मी भारतात कॉमेंट्री करत होतो. जेव्हा आमच्या संघाचा पराभव झाला तेव्हा मला दु:ख झाले होते त्यासोबतच संशयही आला होता. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी आता सर्व खुलासे करणार नाही मात्र एके दिवशी याप्रकरणावरुन जरुर पडदा उठवेन. याचा तपास होणे गरजेचे आहे, असे रणतुंगा म्हणालेत. 

२०११मधील वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये भारताने श्रीलंकेला सहा विकेट्सनी हरवले होते. श्रीलंकाने या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना ५० ओव्हरमध्ये २७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना लवकर बाद करत श्रीलंकेने सामन्यावर पकड बनवली होती. मात्र त्यानंतर भारताने जबरदस्त कामगिरी करताना सामना आपल्या बाजूने झुकवला. भारताने या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवला.