close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'दंगल' सिनेमाप्रमाणे बबिता फोगाटचे वडील अडकले स्टेडियम बाहेर

कारण बबिता फोगाटच्या वडिलांना अंतिम सामना पाहता आला नाही.

Updated: Apr 13, 2018, 12:01 PM IST
 'दंगल' सिनेमाप्रमाणे बबिता फोगाटचे वडील अडकले स्टेडियम बाहेर

गोल्ड कोस्ट : बबिता कुमारी फोगाट ही या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील अंतिम सामन्यात पोहोचली, तिला सुवर्ण पदक मिळवण्यात यश आलं नाही. मात्र तिला आणखी एक गोष्ट सतत सलणारी आहे. कारण बबिता फोगाटच्या वडिलांना अंतिम सामना पाहता आला नाही. दंगल चित्रपटात महावीर फोगाट यांना अंतिम सामना पाहता आला नव्हता, कारण त्यांना एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं होतं. मात्र यावेळी तसं काही झालं नाही. तरीही त्यांना अंतिम सामना पाहता आला नाही. यावर बबिता कुमारी फोगाटने तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.

महावीर फोगाट यांना सामना का पाहता आला नाही?

दंगल सिनेमात बबिता फोगाट हिच्या वडिलांना खोलीत बंद केल्याने ते सामना पाहू शकले नाहीत,  पण गुरूवारी खरोखर बबिता फोगाटचे वडिल बबिता अटीतटीची लढत देत असताना सामना पाहू शकले नाहीत. कारण त्यांना तिकीट मिळालं नाही. आपल्या मुलीच्या सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करत होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही. अखेर सामना संपण्याची आणि निकालाची वाट पाहत ते बाहेर बसले.

दुर्देवाने सिनेमासारखंच काहीसं घडलं

ते बाहेर ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी एक टीव्ही देखील नव्हता, म्हणून त्यांना सामना देखील पाहता आला नाही. दंगल हा सामना महावीर फोगाट यांच्या आयुष्यावर बनवण्यात आला होता. दुर्देवाने सिनेमा सारखंच गुरूवारी ऑस्ट्रेलियात घडलं आणि त्यांना सामना पाहता आला नाही.

बबिताला खूप वाईट वाटलं

वडिलांना सामना पाहता आला नाही, यावर बबिता दु:खी झाली आहे. 'माझे बाबा पहिल्यांदा सामना पाहण्यासाठी आले होते, पण त्यांना सामना पाहता आला नाही. एका खेळाडूला दोन तिकीट मिळतात. पण यावेळी आम्हाला ते देखील देण्यात आले नाहीत. मी खूप प्रयत्न केले, पण तरी देखील त्यांना बाहेरच थांबावं लागलं, याचं मला वाईट वाटतंय, ते जेथे सामन्याच्या वेळी होते, तेथे एक टीव्ही देखील नव्हता, त्यामुळे ते शांतपणे बसले होते'.

कुस्ती सामन्यासाठी आम्हाला तिकीट मिळाली होती, पण मी ते तिकीट कोच राजीव तोमर यांना दिले, आणि त्यांच्याकडेच तिकीट वाटपाची जबाबदारी होती, असं टीम प्रमुख विक्रम सिसोदिया यांनी सांगितलं.

कुस्तीची देखील ५ तिकीटे मिळाली...

राष्ट्रकूल महासंघाकडून आम्हाला जे तिकीट मिळाली, ती आम्ही संबंधित प्रशिक्षकांना देतो, आम्हाला कुस्तीचे देखील ५ तिकीटे मिळाली होती, आम्ही ते कोच राजीव तोमर यांना दिले, पण महावीर फोगाट यांना त्यातलं तिकीट का मिळालं नाही, या विषयी मला माहिती नाही, असं विक्रम सिसोदीया यांनी सांगितलं.

दमलेल्या बबिताचा फायदा घेतला

दरम्यान, फायनलमध्ये कॅनडाच्या डायना विकरने बबिताचा पराभव केला. यामुळे बबिताचं सुवर्णपदक हुकलं. डायनाने बबिताचा ५-२ असा पराभव केला. बबिता कुमारीने महिलांच्या ५३ किलो फ्री स्टाईल कुस्तीत सलग ३ विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र सलग ३ कुस्त्या खेळल्यामुळे, बबिता दमलेली दिसत होती याचाच फायदा डायना विकरने घेतला आणि आधीपासून आक्रमक कामगिरी केली.

डायना विकरने आधी १-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दोघींना २-२ गुण मिळाल्याने बबिता २ आणि डायना ३ असे गुण झाले. मात्र अखेरच्या मिनिटात दोघींमध्ये तुफान झटापट झाली. अखेर पुन्हा डायनाने २ गुणांची कमाई करत निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला.