प्रशिक्षकाला शिवीगाळ केल्यामुळे अशोक डिंडाची हकालपट्टी

प्रशिक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी फास्ट बॉलर अशोक डिंडाची हकालपट्टी झाली आहे.

Updated: Dec 25, 2019, 04:15 PM IST
प्रशिक्षकाला शिवीगाळ केल्यामुळे अशोक डिंडाची हकालपट्टी title=

कोलकाता : प्रशिक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी फास्ट बॉलर अशोक डिंडाची हकालपट्टी झाली आहे. रणजी ट्रॉफीच्या या मोसमात बंगालची सुरुवात चांगली झाली. पहिल्याच मॅचमध्ये बंगालने केरळचा एक दिवसआधीच पराभव केला. यानंतर आंध्र प्रदेशविरुद्धच्या मॅचची तयारी करण्यासाठी बंगालची टीम इडन गार्डनवर सराव करत होती. पण याचवेळी निवड समितीने अशोक डिंडाचं निलंबन करण्याचा निर्णय घेतला.

बंगालच्या टीमचा सराव संपल्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये बॉलिंग प्रशिक्षक राणादीप बोस आणि कर्णधार अभिमन्यू इस्वरन यांच्यात कुजबूज सुरु होती. यावेळी अशोक डिंडाने राणादीप बोस यांना अपशब्द वापरले.

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक डिंडाला माफी मागण्यासाठी संध्याकाळपर्यंतची वेळ देण्यात आली होती. पण त्याने माफी मागितली नसल्यामुळे त्याला डच्चू देण्यात आला आहे. तसंच संपूर्ण रणजी मोसमालाही डिंडाला मुकावं लागू शकतं. अशोक डिंडा सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही बंगालच्या टीममध्ये नव्हता.

अशोक डिंडा भारताकडून १३ वनडे आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. डिंडाने वनडेमध्ये १२ आणि टी-२०मध्ये १७ विकेट घेतल्या. २००९ साली डिंडाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन केलं. तर २०१३ साली इंग्लंडविरुद्धची वनडे डिंडा शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच ठरली. यंदाच्या आयपीएल लिलावामध्येही डिंडावर कोणत्याच टीमने बोली लावली नाही.