एशियन गेम्स २०१८ : भारतीय पथकाचं नेतृत्व करणाऱ्या नीरजबद्दल जाणून घ्या...

नीरज उद्घाटन कार्यक्रमात देशाचा राष्ट्रीय ध्वज हातांत घेऊन भारतीय दलाचं नेतृत्व करताना दिसेल

Updated: Aug 18, 2018, 01:01 PM IST
एशियन गेम्स २०१८ : भारतीय पथकाचं नेतृत्व करणाऱ्या नीरजबद्दल जाणून घ्या...

नवी दिल्ली : आजपासून इंडोनेशियामध्ये १८ व्या एशियन गेम्सला प्रारंभ होतोय. भारतीय खेळाडुंनी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये चांगलंच यश संपादन केलं होतं. त्यामुळेच देशाच्या नजरा आपल्या खेळाडूंवर खिळून राहिल्यात... चार वर्षांतून एकदा होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडू पुन्हा एकदा आपली चमक दाखवतील आणि भारताची मान उंचावतील, अशा अपेक्षा भारतीयांनी व्यक्त केल्यात. एशियन गेम्समध्ये ५७२ खेळाडुंच्या पथकाचं नेतृत्व करण्याची संधी मिळालीय ती भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याला... 

उत्कृष्ठ कामगिरी

नीरज उद्घाटन कार्यक्रमात देशाचा राष्ट्रीय ध्वज हातांत घेऊन भारतीय दलाचं नेतृत्व करताना दिसेल. यंदा एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये खेळण्यात आलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये नीरजनं सुवर्ण पदक पटकावलं होतं... त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीनंतर एशियन गेम्समध्ये पथकाचं नेतृत्व करण्याची संधी त्याला देण्यात आलीय. एशियन गेम्समध्येही नीरज पदकाचा प्रबळ दावेदार आहे.

Neeraj chopra
भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा

विश्व ज्युनिअर रेकॉर्ड

भारतीय भालाफेक खेळाडुंबद्दल बोलायचं तर, विश्व चॅम्पियनशिप स्तरावर अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अंजू बॉबी जॉर्ज हिच्यानंतर नीरजचा क्रमांक लागतो. नीरजनं २०१६ मध्ये आयएएएफ यू २० विश्व चॅम्पियनशिपचा खिताब आपल्या नावावर नोंदविला होता. या यशानंतरही नीरज थांबला नाही... त्यानंतर त्यानं विश्व ज्युनिअर रेकॉर्डही जिंकलं. २०१७ मध्ये नीरजनं ८५.२३ मीटरचा भाला फेकून २०१७ एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं होतं.