IndvsAus: दुसऱ्या वनडेत भारताचा 51 रनने पराभव, सिरीजही गमावली

भारताचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

Updated: Nov 29, 2020, 07:03 PM IST
IndvsAus: दुसऱ्या वनडेत भारताचा 51 रनने पराभव, सिरीजही गमावली

मुंबई : यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तीन एकदिवसीय वन डे सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतापुढे विजयासाठी 390 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण भारतीय संघ 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवत फक्त 338 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने 51 रनने विजय मिळवत सिरीजमध्ये 2-0 ने आघाडी मिळविली. तसेच सिरीजही जिंकली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग दुसर्‍या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारी सिडनी येथे झालेल्या दुसर्‍या सामन्यात संघाचा 51 धावांनी पराभव झाला. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 66 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने सहावा गोलंदाज म्हणून मयंक अग्रवालचा उतरवलं. ज्यामुळे सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने सलग दुसर्‍या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथच्या शतकीय खेळीमुळे तसेच डेविड वॉर्नर, फिंच, मार्लनस लाबूशा आणि ग्लेन मॅक्सवेलच्या सहाय्याने ऑस्ट्रेलियाने 389 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पाच फलंदाजांनी संघासाठी 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 77  बॉलमध्ये  83 धावा केल्या, तर कर्णधार अ‍ॅरोन फिंचने 60 धावा केल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने 64 बॉलमध्ये 104 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 14 फोर आणि 2 सिक्स मारले. चौथ्या क्रमांकावर लाबूशाने 70 धावा केल्या आणि पाचव्या क्रमांकावर मॅक्सवेलने नाबाद 63 धावांची खेळी केली. या सर्व फलंदाजांच्या आश्चर्यकारक खेळीच्या जोरावर दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एवढी मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळविले.

भारतीय संघाकडून मयांक अग्रवालने 28, शिखर धवनने 30, विराट कोहलीने 89, श्रेयस अय्यरने 38, केएल राहुलने 76, हार्दिक पांड्याने 28, रविंद्र जडेजाने 24 तर नवदीप सैनी याने 10 रन केले.