Dan Christian Retirement: क्रिकेट आणि त्यतही क्रिकेटच्या लीग स्पर्धांना मिळणारी लोकप्रियता दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या क्रिकेट विश्वातून एका लोकप्रिय खेळाडूनं अचानक काढता पाय घेतला आहे. जगभरात टी20 क्रिकेट प्रकारातून क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणारा हा खेळाडू म्हणजे Dan Christian. पण, यापुढे मात्र त्याचा खेळ पाहता येणार नाही, कारण ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूनं निवृत्तीची घोषणा केली आहे.
39 वर्षीय डॅननं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीची माहिती क्रिकेटप्रेमींना दिली. यावेळी एक बातमी आहे, असं म्हणत त्यानं अतिशय सकारात्मक वळणावर आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
Some news pic.twitter.com/5xxxkYNQGt
— Dan Christian (@danchristian54) January 20, 2023
'काल मी सिडनी सिक्सर्समध्ये सोबतीनं खेळणाऱ्या खेळाडूंना म्हटलं की BBL च्या अखेरीस मी क्रिकेटमधून निवृत्त होईन. सिडनी सिक्सर्स आज रात्री सामना खेळे आणि अखेरचा सामना होबॉर्ट हरिकेन्सविरोधात असेल' असं लिहित त्यानं आपण या प्रवासात खूप गोष्टी मिळवल्या आणि काही अशा आठवणीही कमवल्या ज्या बालपणीपासून जगता आल्या या शब्दांत भावना व्यक्त केल्या.
साधारण दशकभराचा आढावा घ्यायचा झाल्यास डॅननं जगभरातील टी20 क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये टी20 चा मोलाचा वाटा ठरला. 2010 नंतर त्यानं अनेक स्थानिक टी20 स्पर्धांचं जेतेपद आपल्या नावे केलं. आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं 405 टी 20 सामने खेळले. ज्यामध्ये त्यानं 5809 धावा केल्या आणि 280 विकेट्सही मिळवले.
2021 मध्ये डॅननं ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात पुनरागमन केलं. 2018 मध्ये तो पहिला फर्स्ट क्लास श्रेणीतील सामना खेळला होता. ऑस्ट्रेलिया संघाच्या वतीनं तो 20 एकदिवसीय सामने खेळला. आयपीएल (IPL) मध्ये तो आरसीबी (RCB)कडून खेळला. आयपीएलमध्येही त्यानं क्रिकेटप्रेमींच्या मनाचा ठाव घेतला. इथं त्याच्या नावे 49 सामन्यांमध्ये 460 धावांची नोंद आहे, तर त्यानं या स्पर्धेत 38 विकेट्सही मिळवले होते. डॅननं सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेकांनीच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.