ढाका : ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय प्रतिबंध संपल्यानंतर बांगलादेशचा ऑलराऊंडर क्रिकेटर शाकिब अल हसन आता फिटनेस टेस्ट देणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचार-विरोधी पथकाला सट्टेबाजांशी संपर्काची माहिती न दिल्याने शाकीबवर २ वर्षाची बंदी लावण्यात आली. ज्यात निलंबन देखील होतं, निलंबनचा अवधी मागील वर्षात २९ ऑक्टोबरला संपला आहे.
अहवालानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्ड येत्या काही दिवसात बंगबंधु टी-२० टुर्नामेंट खेळवणार आहे. त्या आधी त्यांनी ९ ते १० नोव्हेंबर रोजी फिटनेस टेस्टचं आयोजन केलं आहे. शेर-ए-बांगला या नॅशनल स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात शाकिब समवेत जवळजवळ ८० खेळाडू आपली फिटनेस टेस्ट देणार आहेत.
मुख्य निवडकर्ता मिन्हाजुल अबेदिन यांनी मागील आठवड्यात म्हटलं होतं की, बोर्डची इच्छा आहे, शाकिबने टी-२० टुर्नामेंटमध्ये खेळलं पाहिजे. बंदी संपल्यानंतर शाकिब अल हसन आयसीसीची वनडे ऑलराऊंडर रँकिंगच्या टॉपवर पोहोचला आहे.
बंदी लावण्याविषयी या क्रिकेटर शाकिबने म्हटलं होतं, मला असं वाटतं की मी वेडेपणा केला, माझा अनुभव आणि मी जेवढे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी आचार संहितेचे जेवढे आता धडे घेतले आहेत, याचा विचार केला तर मला असं वाटतं, (सट्टेबाजांकडून संपर्क करण्याची माहिती अधिकाऱ्यांना न देणे) माझी ही सर्वात मोठी चूक होती.
शाकिबने पुढे म्हटलं आहे, मला या गोष्टीचा खेद आहे. कुणीही असे संदेश, सट्टेबाजांचे फोन यांना सहज घ्यायला नको, किंवा कानाडोळा करायला नको. सुरक्षित राहण्यासाठी आपण ही माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीला दिली पाहिजे, मी यातून शिकलो आणि मला वाटतं हा सर्वात मोठा धडा मी शिकलो.