Best Bowling Figure: क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी कोणी केली आहे असं विचारलं तर तुम्ही वेगवेगळ्या नावाजलेल्या गोलंदाजांचे विक्रम सांगाल. पण तुम्ही कधी एकही धाव न देता 8 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाबद्दल ऐकलं आहे का? जर नसेल तर ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. श्रीलंकेतील एका तरुण गोलंदाजाने हा चमत्कार करुन दाखला आहे. सेलवसकरन रिशीयुधान नावाच्या 10 वर्षीय मुलाने 9.4 ओव्हरपैकी 9 ओव्हर निर्धाव गोलंदाजी केली. त्याने एकही धाव न देता चक्क 8 विकेट्स घेतल्या.
चिमुकल्या सेलवसकरन रिशीयुधानने केलेली गोलंदाजी पाहून जगभरातील क्रिकेट चाहते थक्क झालेत. आपल्या या कामगिरीबद्दल बोलताना सेलवसकरन रिशीयुधानने, "मला ओव्हरमधील प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीने टाकायचा आहे. यामध्ये ऑफ स्पिन, लेग स्पिन, कॅरम बॉल, लूप, फ्लॅट लूप आणि फास्ट बॉल असेल. नेथन लायन हा माझा आवडता खेळाडू आहे. मला त्याच्याप्रमाणेच गोलंदाजी करायला आवडतं. मी वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत श्रीलंकन क्रिकेट संघातून क्रिकेट खेळू इच्छितो," असं म्हटलं.
नेथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू आहे. तो जगातील अव्वल फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 496 विकेट्स घेतल्या आहेत. 36 विकेट्स घेतल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणार गोलंदाज ठरेल. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 29 आणि टी-20 मध्ये केवळ एक विकेट घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये नेथन लायनची सर्वोत्तम कामगिरी 50 धावांवर 8 विकेट्स अशी आहे. याशिवाय त्याने 203 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये 370 डावांमध्ये 736 विकेट्स घेतल्यात.
नेथन लायनला आपलं प्रेरणास्थान मानणाऱ्या सेलवसकरन रिशीयुधान हा श्रीलंकन असून श्रीलंकेने जागतिक क्रिकेटला अनेक उत्तम फिरकीपटू दिलेत. सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू मुथैय्या मुरलीधरनही श्रीलंकन आहे. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 51 धावांवर 9 विकेट्स अशी आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 534 आणि टी-20 मध्ये 13 विकेट्स घेतल्यात. म्हणजेच मुरलीधरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1300 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आजी-माजी यशस्वी फिरकीपटूंबद्दल बोलायचं झालं तर शेन वॉर्न, अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्वीन, हरभजन सिंग, राशीद खान, कुलदीप यादव, अॅडम झॅम्पा, ग्लेन मॅक्सवेल यासारख्या खेळाडूंच्या नावांचा आवर्जून उल्लेख करता येईल.