एका बॉक्सरची शोकांतिका, कालचा पदकविजेता चॅम्पियन आजचा ड्राईव्हर...

बॉक्सिंगमधला मातब्बर म्हणून नावाजला जाण्याऐवजी लाखा सिंग फक्त 8,000 रुपयांसाठी टॅक्सी चालवतो.

Updated: Dec 25, 2017, 08:23 PM IST
एका बॉक्सरची शोकांतिका, कालचा पदकविजेता चॅम्पियन आजचा ड्राईव्हर... title=

चंडीगढ : बॉक्सिंगमधला मातब्बर म्हणून नावाजला जाण्याऐवजी लाखा सिंग फक्त 8,000 रुपयांसाठी टॅक्सी चालवतो.

निवडक कौतुक

वेगवेगळ्या खेळातल्या पदकविजेत्या खेळाडूंना सध्या बरे दिवस आले आहेत. त्यांना बक्षिसं मिळतात आणि कौतुकही होतं. त्यात काही वावगं नाही. ते झालंच पाहिजे. पण सर्वच खेळाडूंच्या बाबतीत हे होत नाही. विशेषत: निवृत्त झालेल्या पदकविजेत्यांची तर कोणालाही आठवण येत नाही. मग त्यांच्या परिस्थितीचा हालहवाल घेणं दुरंच राहिलं. 

लाखाची सिंगची व्यथा

असाच एक पदकविजेता बॉक्सर आहे, लुधियानातला 52 वर्षांचा "लाखा सिंग". आपल्या उदरनिर्वाहासाठी तो लुधियानात टॅक्सी चालवतो. त्यातून त्याला दरमहा 8,000 रुपये मिळतात. त्यातच बिचाऱ्याला घर चालवावं लागतं. ती टॅक्सीसुद्धा त्याच्या मालकीची नाही. 

देशाची आशा 

लाखा सिंग काही साधासुधा खेळाडू नाही. 1994 च्या तेहरान आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ब्रांझ पदक तर पुढच्याच वर्षीच्या ताश्कंदला झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रजत पदकाचा तो मानकरी आहे. त्याचबरोबर पाच वेळा नॅशनल चॅम्पियनसुद्धा तो आहे. 

हलाखीचं आयुष्य

त्याच्या या कामगिरीमुळे 1996 सालच्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये भारताच्या त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. दुर्दैवाने लाखा सिंगची कामगिरी तिथे अपेक्षेप्रमाणे झाली नाही. तरीही नव्वदच्या दशकात बॉक्सिंगमध्ये पदकासाठी तोच भारताचं प्रमुख आशास्थान होता. तरीही तो आज एक दुर्लक्षित हलाखीचं आयुष्य जगतोय. 

अवहेलनेचं शल्य

आपल्या परिस्थितीबद्दल त्याने अनेकवेळा भारतीय बॉक्सिंग फेडरेशन आणि पंजाब सरकारला पत्र लिहिली आहेत. परंतु त्यांनी त्याची अजिबात दखल न घेता त्याला साधा प्रतिसादही दिलेला नाही. यामुळे तो चांगलाच व्यथीत झाला आहे. माझ्या देशानेच माझं दुख समजून घेतलं नसल्याची व्यथा त्याला आहे. पदकांच्या विवंचनेत असलेलं आपलं क्रिडाक्षेत्र आणि आपला समाज त्याची दखल घेईल का ? 
ही एका बॉक्सरची शोकांतिका नसून संपूर्ण देशाचीच शोकांतिका आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x