मुंबई : शेन वॉटसनच्या वादळी शतकामुळे चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. हैदराबादनं ठेवलेल्या १७९ रनचा पाठलाग करताना चेन्नईनं १८.३ ओव्हरमध्ये १८१/२ एव्हढा स्कोअर करत ८ विकेटनं ही मॅच जिंकली. शेन वॉटसननं ५७ बॉलमध्ये नाबाद ११७ रन केल्या. वॉटसनच्या खेळीमध्ये ८ सिक्स आणि ११ फोरचा समावेश होता. फॅप डुप्लेसिसची विकेट लवकर पडल्यानंतर रैनानं वॉटसनला चांगली साथ दिली. रैनानं २४ बॉलमध्ये ३२ रन केल्या. वॉटसननं या मॅचची सुरुवात अतिशय संथ केली. भुवनेश्वर कुमारची पहिली ओव्हर वॉटसननं मेडन खेळून काढली. पहिल्या १० बॉलमध्ये वॉटसनला एकही रन काढता आली नाही पण त्यानंतरच्या ४१ बॉलमध्ये वॉटसननं शतक पूर्ण केलं. हैदराबादकडून संदीप शर्मानं एक तर कार्लोस ब्रॅथवेटनंही एक विकेट घेतली.
हैदराबादनं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादनं २० ओव्हरमध्ये १७८/६ एवढा स्कोअर केला. या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार धोनीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंग करणाऱ्या हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनिंगला आलेला श्रीवत्स गोस्वामी स्कोअरबोर्डवर १३ रन असताना रन आऊट झाला. त्यानंतर शिखर धवन आणि हैदराबादचा कर्णधार केन विलियमसननं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण धवन २६ रनवर आऊट झाला. केन विलियमसननं ३६ बॉलमध्ये सर्वाधिक ४७ रन केल्या. तर युसुफ पठाणनं २५ बॉलमध्ये नाबाद ४५ रन केल्या. कार्लोस ब्रॅथवेटनं ११ बॉलमध्ये २१ रनची जलद खेळी केली. ब्रॅथवेट २० व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आऊट झाला. चेन्नईकडून एनगीडी, शार्दुल ठाकूर, करण शर्मा, ड्वॅन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी १ विकेट मिळाली.
आयपीएल जिंकण्याची चेन्नईची तिसरी वेळ आहे. याआधी चेन्नईनं २०१० आणि २०११ साली आयपीएल जिंकली होती. तिसऱ्यांदा आयपीएल जिंकण्याच्या मुंबईच्या रेकॉर्डशी चेन्नईनं आता बरोबरी केली आहे. मुंबईनं २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएल जिंकली होती. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नईनं आयपीएलमध्ये कमबॅक केलं होतं. आणि आता मोठ्या दिमाखात त्यांनी फायनलमध्ये विजय मिळवला आहे.