लाहोर : माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हक याची पाकिस्तान टीमच्या मुख्य प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे. यानंतर लगेचच मिसबाहने खेळाडूंच्या खाण्यावर बंधनं आणली आहेत. खेळाडूंचा डाएट प्लान बदलण्याचा निर्णय मिसबाहने घेतला आहे. यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना आता जास्त तेल आणि मसाला असलेले पदार्थ, बिर्याणी आणि मिठाई खाता येणार नाही.
वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी त्यांच्या खेळाडूंच्या डाएट प्लानवर संताप व्यक्त केला होता. पाकिस्तानचे खेळाडू पिझ्झा आणि बर्गर खाऊन जाड झाले आहेत, असे खेळाडू भारताचा काय पराभव करणार? असे सवाल या प्रेक्षकांनी उपस्थित केले होते.
काहीच दिवसांपूर्वी मिसबाह उल हकची पाकिस्तान टीमच्या मुख्य प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर वकार युनूस पाकिस्तान टीमचे बॉलिंग प्रशिक्षक झाले आहेत. या दोघांचा कार्यकाळ ३ वर्ष असणार आहे. मिसबाह उल हकने २०१७ साली आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने ७५ टेस्ट, १६२ वनडे आणि ३९ टी-२० मॅच खेळल्या.