'तुझ्या देशाला तुझा अभिमान'; सिंधूबद्दलच्या ट्विटनंतर काँग्रेस ट्रोल

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवण्याचं भारताचं स्वप्न साकार झालं.

Updated: Aug 26, 2019, 04:46 PM IST
'तुझ्या देशाला तुझा अभिमान'; सिंधूबद्दलच्या ट्विटनंतर काँग्रेस ट्रोल title=

मुंबई : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवण्याचं भारताचं स्वप्न साकार झालं. भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने इतिहास घडवला आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये सिंधूने जपानच्या ओकुहाराला पराभूत केलं, आणि सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारी सिंधू पहिली भारतीय ठरली.

सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. काँग्रेसनेही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सिंधूला शुभेच्छा दिल्या. पण या ट्विटनंतर काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे.

'जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय ठरल्याबद्दल पी.व्ही.सिंधूचं अभिनंदन. तु तुझ्या देशाची मान अभिमानाने उंचावलीस,' असं ट्विट काँग्रेसने केलं. पण या ट्विटमध्ये काँग्रेसने तुझा देश असा शब्द का वापरला? आपला देश असा शब्द का वापरला नाही? असे प्रश्न विचारत यूजर्सनी काँग्रेसला ट्रोल केलं आहे.

जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने चौथ्या क्रमांकाच्या नोजोमी ओकुहाराला २१-७ आणि २१-७ अशा सेटमध्ये मात दिली. ही मॅच ३७ मिनिटं चालली.

या स्पर्धेत सिंधूनं यापूर्वी दोन रौप्य आणि दोन ब्राँझ पदकं पटकावली आहेत. २०१७ आणि २०१८ साली सिंधूला रौप्य आणि २०१३ आणि २०१४ साली सिंधूला ब्राँझ पदक मिळालं होतं.