अम्पायरच्या डोक्यावर बॉल आदळला, कोमात असतानाच मृत्यू

पेमब्रोकशायर क्रिकेटनं गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीय

Updated: Aug 16, 2019, 03:59 PM IST
अम्पायरच्या डोक्यावर बॉल आदळला, कोमात असतानाच मृत्यू

लंडन : ब्रिटनमध्ये क्रिकेटच्या मैदानात एक भयंकर घटना घडलीय. वेगानं आलेला बॉल डोक्यावर आदळल्यानंतर अम्पायर जॉन विल्यम्स यांचं निधन झालंय. ते ८० वर्षांचे होते. पेमब्रोकशायर काऊंटी डिव्हिजन - २ मध्ये पेमब्रोक आणि नारबर्थ दरम्यान सुरू असलेल्या मॅच दरम्यान जॉन विल्यम्स अम्पायरिंग करत होते. त्याचवेळेस ही दुर्घटना घडली. डोक्यावर बॉल आदळल्यानंतर जॉन जागेवरच कोसळले. यानंतर त्यांना तातडीनं कार्डिफच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे ते कोमामध्ये होते. यानंतर त्यांना १ ऑगस्ट रोजी हेवरफोर्डवेस्टच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. इथंच दोन आठवड्यानंतर त्यांचं निधन झालं. 

पेमब्रोकशायर क्रिकेटनं गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीय. 'हेडलटनमध्ये राहणाऱ्या अम्पायर जॉन विल्यम्स यांच्याबद्दल दु:खद बातमी मिळतेय. आज सकाळी त्यांचं निधन झालं. या कठिण समयी पेमब्रोकशायर क्रिकेट हिलेरी आणि त्यांच्या मुलाच्या सोबत आहेत' असं क्लबनं ट्विटरवर म्हटलंय. 

यापूर्वीही ऑस्ट्रेलियन ओपनर फिलिप ह्यूज याचा मृत्यू डोक्यावर बॉल आदळल्यानं झाला होता. बॉल लागल्यनंतर फिलिपही मैदानातच कोसळला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ब्रेन हॅमरेजनं त्याचा मृत्यू झाला होता.