बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थमध्ये गेम्स स्पर्धेत भारताच्या महिला संघानेही पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडच्या संघाला पराभवाची धूळ चारत महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. यासह टीम इंडिया अंतिम सामन्यात पोहचणारा पहिला संघ ठरलाय. भारताने अटीतटीच्या सामन्यामध्ये इंग्लंडवर 4 धावांनी विजय मिळवला आहे. स्टार खेळाडू स्मृती मंधानाने 61 धावांची अर्धशतकी खेळी केली. (cwc 2022 womens team india beat england by 4 runs and entire final)
भारताने नाणेफेक जिंकल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या स्मृतीने जोरदार सुरूवात केली. स्मृतीने आक्रमक पवित्रा घेत एक बाजून लावून धरली. शेफालीही तिला साथ देत होती. या दोघांनी अर्धशतकी सलामी भागीदारी केली.
भारत मजबूत स्थितीत होता. मात्र 76 धावांवर शेफाली वर्मा 15 धावा करून माघारी परतली. त्यानंतर आलेल्या जेमिमानेही नाबाद 44 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतने 22 धावा केल्या. अखेर 20 षटकात भारताने इंग्लंड संघाला 165 धावांचं आव्हान दिलं.
इंग्लंडनेही लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात केली. मात्र इंग्लंड संघाच्या 3 खेळाडू धावबाद झाल्या. इंग्लंडची कर्णधार नटॅलीने एकाकी खिंड लढवली. मात्र नटॅलीही दबावात रन आऊट झाली. भारताच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडला 20 षटकांनंतर 160 धावाच करता आल्या.
दरम्यान, भारतीय संघाला आता फायनलमध्ये न्यूझीलंडचा आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ टीम इंडियाशी दोन हात करणार आहे.