मुंबई : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीची इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनसोबत ट्विटरवर शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेतल्या प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियाच्या टीमवर वैयक्तिक टीका केली होती. या टीकेवर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आक्षेप घेतला होता. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या या आक्षेपावर मायकल वॉननं ट्विट केलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी होणाऱ्या वैयक्तिक टीकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबद्दल मला हसायला येतंय. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या वर्तनामुळेच सीरिजमधलं वातावरण खराब झालं आहे, असं ट्विट मायकल वॉननं केलं होतं.
मायकल वॉनच्या या टीकेवर डेव्हिड वॉर्नरची पत्नी कॅन्डीस वॉर्नरनं प्रत्युत्तर दिलं आहे. तुला हसायला येतंय हे पाहून मला आनंद झाला आहे. तुझ्या पत्नीबाबत कोणी असं वक्तव्य केलं तरी तुला असंच वाटेल का, असा सवाल कॅन्डीस वॉर्नरनं उपस्थित केला आहे.
I’m glad it’s making you laugh.
— Candice Warner (@CandyFalzon) March 24, 2018
Wow so you would approve of the same treatment to your wife and 3 kids??
— Candice Warner (@CandyFalzon) March 24, 2018
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट मॅचवेळी डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डिकॉकमध्ये तुफान राडा झाला. या दोघांमध्ये हाणामारी व्हायचीच बाकी होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. यानंतर आता डेव्हिड वॉर्नरनं या सगळ्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं आहे.
डिकॉकनं माझ्या पत्नीबाबत अभद्र टिप्पणी केल्यामुळे मी चिडलो आणि त्याच्या अंगावर धावून गेलो, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे. मी नेहमीच माझ्या कुटुंबाच्या बाजूनं उभा राहिन, असं वक्तव्य डेव्हिड वॉर्नरनं केलं आहे. ड्रेसिंग रूममध्ये जाताना डिकॉकच्या वक्तव्यानंतर माझा ताबा सुटला, अशी कबुली डिकॉकनं दिली. दुसऱ्या टीमच्या खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी माझ्यावर टिप्पणी केली तरी मला फरक पडणार नाही पण पत्नीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे माझा पारा चढला, अशी प्रतिक्रिया डिकॉकनं दिली. झालेल्या प्रकाराबद्दल मला खेद आहे, असंही वॉर्नर म्हणाला.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी ही घटना घडली. चहापानावेळी ड्रेसिंग रूममध्ये जात असताना वॉर्नर आणि डिकॉकमध्ये बाचाबाची झाली. यानंतर आयसीसीनं वॉर्नरची ७५ टक्के मॅच फी कापली. तसंच त्याच्या खात्यामध्ये ३ डिमेरिट पॉईंट दिले. डिकॉकवरही कारवाई म्हणून २५ टक्के फी कापण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँकरॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
स्मिथ आणि वॉर्नरचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं वर्षभरासाठी तर बँकरॉफ्टचं नऊ महिन्यांसाठी निलंबन केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.
बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या बॉलशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.