मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्याला जुलै महिन्यापासून सुरुवात होईल. भारतीय निवड समितीनं टी-20 आणि वनडे सीरिजसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. भारत इंग्लंडमध्ये ३ टी-20, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ३ जुलैला पहिल्या टी-20नं होईल. या दौऱ्यामध्ये ४ भारतीय खेळाडूंना रेकॉर्ड बनवण्याची संधी आहे.
भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार त्याच्या वनडे क्रिकेटमधल्या १००व्या विकेटपासून फक्त काही पावलं दूर आहे. २०१२ साली पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन केलं होतं. त्यानंतर २०१७ साली भुवनेश्वरचं टीममध्ये पुनरागमन झालं. पुनरागमनानंतर भुवनेश्वरच्या बॉलिंगमध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे. १०० विकेट पूर्ण करायला भुवनेश्वरला १० विकेटची गरज आहे. इंग्लंडमधली खेळपट्टी आणि वातावरण बघता भुवनेश्वर हे रेकॉर्ड बनवू शकतो. वनडेमध्ये १०० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा भुवनेश्वर १९वा बॉलर बनेल.
वनडे क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं लगावणाऱ्या रोहित शर्माच्या या दौऱ्यामध्ये १० हजार आंतरराष्ट्रीय रन पूर्ण होऊ शकतात. १० हजार रन पूर्ण करण्यासाठी रोहितला ७५ रनची आवश्यकता आहे. हे रेकॉर्ड करणारा रोहित १३वा खेळाडू ठरेल.
महेंद्रसिंग धोनीला वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रन बनवण्यासाठी आणखी ३३ रनची आवश्यकता आहे. वनडेमध्ये १० हजार रन करणारा धोनी १२ वा खेळाडू ठरेल. १० हजार रन आणि ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा धोनी हा एकमेव खेळाडू असेल.
टी-20 मध्ये दोन हजार रन बनवायला विराट कोहलीला आणखी १७ रनची गरज आहे. टी-20मध्ये दोन हजार रन करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू होईल.