ड्राईव्हरचा मुलगा भारताचा फास्ट बॉलर झाला अन् वॉर्नरलासुद्धा दणका दाखवला...

गल्लीबोळात क्रिकेट खेळणाऱ्या नवदीप सैनीचं क्रिकेट हेच जीवन झालं.

Updated: Dec 23, 2017, 07:34 PM IST
ड्राईव्हरचा मुलगा भारताचा फास्ट बॉलर झाला अन् वॉर्नरलासुद्धा दणका दाखवला... title=

नवी दिल्ली : गल्लीबोळात क्रिकेट खेळणाऱ्या नवदीप सैनीचं क्रिकेट हेच जीवन झालं.

तेज गोलंदाजाची गरज

सध्या भारताकडे भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, ईशांत शर्मा हे तेज गोलंदाज आहेत. यांच्या जोडीला आणखी एक तेज गोलंदाजाचा समावेश भारतीय संघात होऊ शकतो. तो म्हणजे नवदीप सैनी. 

हरियाणातल्या गावातला नवदीप

हरियाणातल्या कर्नाल जिल्ह्यातल्या तरावडी गावचा नवदीप सैनी आज आपल्या मेहनतीने आणि गुणवत्तेमुळे अनेकांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना आपली कमाल दाखवताना त्याने 140 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करताना दोन्ही डावात मिळून सात विकेट घेतले. त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं. त्याच्या कामगिरीच्या जोरावरच दिल्लीने बंगालवर एक डाव आणि 26 धावांनी दणदणीत विजय मिळवत रणजीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. 

खडतर प्रवास

रणजीपर्यंतचा हा प्रवास मात्र तितका सोपा नव्हता. वडील ड्राईव्हर असल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे ईच्छा असूनही योग्य प्रशिक्षण घेता येत नव्हतं. कारण त्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ नव्हतं. वडील आणि भावाला वाटत होतं की क्रिकेटवर पैसे खर्च केले तर वाया जातील. त्यांची इच्छा होती की मुलांनी इंजिनियर व्हावं. यामुळे तो स्थानिक पातळीवरच क्रिकेट खेळत होता. त्याच्या भावालासुद्धा क्रिकेटमध्ये रस होता. भावाचा कल फलंदाजीकडे तर नवदीपला मात्र फलंदाजीबरोबरच गोलंदाजीचीसुद्धा आवड होती. हळूहळू त्याचा कल गोलंदाजीकडे वाढत गेला. त्याने गोलंदाजीकडेच लक्ष केंद्रीत केलं.

वॉर्नरची भीती

यावर्षी भारताच्या अ संघाकडून खेळण्याची संधी नवदीपला मिळाली. त्यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरला गोलंदाजी करण्याची संधी त्याला मिळाली. सुरुवातीला त्याला ऑस्ट्रेलियाच्या या फलंदाजीची खूप भीती वाटायची, पण नवदीपनेच वॉर्नरला आउट केलं आणि त्याची भीती पळाली. 

दिल्लीच्या टीममध्ये निवड

हरियाणाचा क्रिकेटर सुमित नरवालच्या मार्गदर्शन आणि मदतीच्या जोरावर नवदीप रणजी स्पर्धेपर्यत पोहोचला. गौतम गंभीरने नेट प्रॅक्टीसच्या वेळेस नवदीपची गोलंदाजी बघितली आणि त्याला प्रोत्साहन दिलं. आणि एक दिवस दिल्लीच्या टीममध्ये त्याची निवड झाल्याचं त्याला कळालं. 

गौतम गंभीरचा विश्वास

नवदीप हरियाणाचा असल्यामुळे सर्वांनी त्याच्या नावाला विरोध केला. दिल्लीच्या संघात बाहेरच्या खेळाडूंना घेतल्याने दिल्लीच्या खेळाडूंवर अन्याय होईल, असं सर्वाचं म्हणणं होतं. पण गौतम गंभीर नवदीपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. नवदीपने त्याचा विश्वास सार्थ ठरवत चमत्कार घडवला.