पाकिस्तानविरुद्धच्या सगळ्या मॅचवर बंदी हवी- गौतम गंभीर

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरु आहे.

Updated: Sep 19, 2018, 05:58 PM IST
पाकिस्तानविरुद्धच्या सगळ्या मॅचवर बंदी हवी- गौतम गंभीर  title=

दुबई : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरु आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका वर्षानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने आहेत. पण भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारची मॅच होऊ नये, असं वक्तव्य क्रिकेटपटू गौतम गंभीरनं केलं आहे. तसंच भारत-पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारेच संबंध असता कामा नये, असंही गंभीरला वाटतंय. जर भारत-पाकिस्तान द्विपक्षीय सीरिज खेळत नसेल तर आशिया कपमध्ये का खेळत आहे. आशिया कपमध्ये खेळत असाल तर मग द्विपक्षीय सीरिजला विरोध का? असा सवाल गौतम गंभीरनं उपस्थित केला आहे.

आशिया कपमधल्या भारत-पाकिस्तानच्या मॅचवरून आधीच वाद झाला होता. आशिया कपच्या वेळापत्रकावर बीसीसीआयनं आक्षेप घेतले होते. हाँगकाँगविरुद्धची मॅच खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच भारताचा सामना पाकिस्तानशी आहे. त्यामुळे बीसीसीआयनं वेळापत्रकावर टीका केली होती. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं तर भारतानं आशिया कपमधून माघार घ्यावी, असा सल्ला दिला होता.

मुंबईवरच्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट बंद

भारत आणि पाकिस्ताननं 2007 नंतर द्विपक्षीय सीरिज खेळली नाही. 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर 2012 साली भारत-पाकिस्तानमध्ये वनडे आणि टी-20 सीरिज झाली होती. 2013 नंतर दोन्ही देशांमध्ये कोणतीही सीरिज झालेली नाही.