२५ बॉलमध्ये शतक, टीमचा स्कोअर ३०० पार, टी-२० मधला विक्रम!

टी-२० क्रिकेटमध्ये दररोज नवनवीन विक्रम होतच असतात.

Updated: Apr 23, 2019, 08:38 PM IST
२५ बॉलमध्ये शतक, टीमचा स्कोअर ३०० पार, टी-२० मधला विक्रम! title=

मुंबई : टी-२० क्रिकेटमध्ये दररोज नवनवीन विक्रम होतच असतात. स्कॉटलंडचा बॅट्समन जॉर्ज मुंसे यानेही अशाच एका विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंसेने ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेवन टीमकडून खेळताना फक्त २५ बॉलमध्ये शतक केलं आहे. याचबरोबर मुंसेने एका ओव्हरमध्ये ६ सिक्सही मारले आहेत. ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेवन आणि बाथ सीसीमध्ये झालेल्या अनधिकृत टी-२० मॅचमध्ये मुंसेने ३९ बॉलमध्ये १४७ रनची खेळी केली.

मुंसेचा साथीदार जीपी विलोज यानेही ५३ बॉलमध्ये शतक झळकावलं. मुंसेने फक्त १७ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. यानंतर पुढच्या ८ बॉलमध्ये त्याने शतकापर्यंत मजल मारली. मुंसेच्या खेळीमध्ये ५ फोर आणि २० सिक्सचा समावेश होता.

ग्लोसेस्टरशायरने या दोन बॅट्समनच्या शतकांच्या जोरावर टी-२० इतिहासात ३ विकेट गमावून ३२६ रन केले. पण ही मॅच अनधिकृत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या रेकॉर्डमध्ये याची गणना होणार नाही.

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात खेळाडूच्या सर्वाधिक स्कोअरचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आयपीएलमध्ये पुण्याविरुद्ध नाबाद १७५ रनची खेळी केली होती. यामुळे गेलच्या टीमचा स्कोअर २० ओव्हरमध्ये २६३ एवढा झाला होता.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. काहीच दिवसांपूर्वी हजरतुल्ला जजईच्या १६२ रनमुळे अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध २७८ रनचा डोंगर उभा केला होता.