आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्णपदक

या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बजरंग पुनिया २०२० सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील कुस्तीतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 

Updated: Apr 23, 2019, 08:15 PM IST
आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्णपदक title=

बीजिंग: भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मंगळवारी चीन येथे सुरु असणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याने चुरशीच्या मुकाबल्यात कझाकिस्तानच्या सयातबेक ओकासोव्ह याचा १२-७ असा पराभव केला. ६५ किलो वजनी गटातील या अंतिम सामन्यात बजरंग पुनिया सुरुवातीला २-७ असा पिछाडीवर पडला होता. त्यावेळी केवळ ६० सेकंदांचा खेळ बाकी राहिला होता. मात्र, यानंतर बजरंगने शानदार खेळ करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 

२०१७ मध्येही आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्णपदक मिळाले होते. तर गेल्यावर्षी त्याला कांस्यपदकावर समाधाना मानावे लागले होते. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बजरंग पुनिया २०२० साली टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील कुस्तीतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 

यंदाच्या आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होईपर्यंत बजरंग पुनिया याने केवळ एक गुण गमावला होता. उपांत्य फेरीमध्ये बजरंगने उझबेकिस्तानच्या सिरोजिदीन खासानोव याला १२-१ अशा फरकाने पराभूत केले होते. तत्पूर्वी बजरंगने इराणच्या पेमैन बियाबानी आणि श्रीलंकेच्या चार्ल्स फर्न यांना धूळ चारली होती. 

आता भारताला महिलांच्या गटात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, विनेश फोगट, पूजा धांडा आणि दिव्या काकरान यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.