अर्धमॅरेथॉन स्पर्थेत तीर्था पुन, मोनिका आथरेची बाजी

मुंबई मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पहाटे सव्वापाच वाजता सुरु झाली.

Updated: Jan 19, 2020, 03:12 PM IST
अर्धमॅरेथॉन स्पर्थेत तीर्था पुन, मोनिका आथरेची बाजी

मुंबई : आशियातील सर्वात मोठी आणि मानाचा 'गोल्ड लेबल' दर्जा मिळवणारी ही मुंबई मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पहाटे सव्वापाच वाजता सुरु झाली. अर्धमॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात तीर्था पुन याने १:०५:३९ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले. मान सिंग हा १:०६:०६ सेकंद वेळेसह रौप्यपदकावर नाव कोरले तर, बलीअप्पा ए बी ने १:०७:११ वेळेसह कांस्यपदक पटकावले. 

तर, अर्धमॅरेथॉनच्या महिला गटात महाराष्ट्रच्या धावपटूंनी चमक दाखवली. आरती पाटीलने १:१८.०३ सेकंद वेळेसह रौप्यपदक मिळवले. तर, नाशिकच्या मोनिका आथरेने १:१८:३३ सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले. या गटात पारुल चौधरीने १:१५:३७ वेळेसह अव्वल स्थान पटकावले.

मुंबई मॅरेथॉनमध्ये एकीकडे तरूणाई उत्साहात धावत असताना वृद्ध मंडळींनीही जोरदार सहभाग घेतला. एका आजोबांनी विविध कसरती, योगासनं करून आपलं वय हा केवळ एक आकडा आहे हे सिद्ध केलं. 

मुंबई मॅरेथॉनमध्ये व्हिलचेअर मॅरेथॉनलाही सुरुवात झाली. गीतकार गुलजार यांनी स्वत: फ्लॅग ऑफ केलंय. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजूजू आणि अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते.  

यंदाच्या स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धकांच्या बक्षीस रकमेत वाढ झाली नसली तरी एकूण स्पर्धेत ४ लाख २० हजार यूएस डॉलरची खैरात करण्यात आलीये. 

शिवाय वैद्यकीय स्टेशने, पाणी केंद्र, टेट्रापॅक, बेसकॅम्प, रिस्टोरेशन केंद्र आदी सुविधांची उत्तम बडदास्त ठेवण्यात आली आहे. मॅरेथॉनसाठी वाहतुकीच्या नियोजनबरोबरच मुंबई पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.