मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट टी-२० टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर अडचणीत आली आहे. आयसीसी महिला वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतला पंजाब पोलिसांनी मोठ्या उत्साहात डीएसपीची नोकरी दिली. यासाठी हरमनप्रीतनं रेल्वेची नोकरी सोडली. रेल्वेनं सुरुवातीला हरमनप्रीतला मुक्त केलं नव्हतं, पण पंजाब सरकारनं प्रयत्न करून हरमनप्रीतला रेल्वेच्या सेवेतून मुक्त केलं. पण आता हरमनप्रीतची ग्रॅज्युएशन डिग्री बोगस असल्याचं कारण पंजाब पोलिसांनी दिली आहे.
पंजाबच्या मोगामध्ये राहणाऱ्या हरमनप्रीत कौरचा अर्जुन पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. १ मार्चला हरमनप्रीत कौरला पंजाब पोलिसांच्या सेवेत डीएसपी म्हणून घेण्यात आलं. पंजाब पोलिसांनी हरमनप्रीतची ग्रॅज्युएशन डिग्री मेरठ विद्यापीठात पाठवली. पण तिकडे हरमनप्रीतच्या डिग्रीचा रजिस्ट्रेशन नंबर मिळाला नाही. याप्रकरणी पोलिसांनी सगळी माहिती राज्य सरकारकडे पाठवली आहे. पंजाब पोलिसांनी गृह विभागाला प्रस्ताव पाठवला आहे. हरमनप्रीतची डिग्री वैध नसल्यामुळे ती डीसीपीच्या पदावर राहू शकत नाही, असं या प्रस्तावात लिहिण्यात आलं आहे.
याप्रकरणी मला अजून काहीही माहिती मिळालेली नाही. पोलीस खात्याशी बोलल्यानंतर याबद्दल मी प्रतिक्रिया देईन, असं हरमनप्रीत म्हणाली. २०१७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये हरमनप्रीतनं तिच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी केली. या मॅचमध्ये हरमनप्रीतनं १७१ रन केल्या होत्या. वर्ल्ड कप इतिहासामध्ये हा कोणत्याही भारतीयानं केलेला सर्वाधिक स्कोअर आहे. हरमनप्रीत सध्या भारतीय टी-२० टीमची कर्णधार आहे.