मुंबई : भारताची सुवर्णकन्या हिमा दास (Hima Das) ने जबरदस्त कामगिरी केली आहे. धावपटू हिमा दासने तिचा यशाचा क्रम टिकवून ठेवत १५ दिवसात चौथे सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले आहे. चेकिया देशात झालेल्या टाबोर अॅथलेटिक्स टूर्नामेंटमध्ये (Tabor Athletics Meet in Czech Republic) २०० मीटर स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले आहे. आसामच्या हिमा दासने बुधवारी झालेली शर्यत २३.२५ सेकंदात पूर्ण करूण सुवर्ण पदक स्वत: च्या नावावर केले. तिची सहायक वी.के विसमाया हिने २३.४३ सेकंदाचा वेळ घेत दुसरा क्रमांक पटकावला. ही त्यांच्या या सीजनची सगळ्यात चांगली कामगिरी आहे.
२ जुलैनंतर हिमाचे युरोपमध्ये झालेल्या टुर्नामेंट मधले हे चौथे सुवर्णपदक आहे. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर हिमाने ट्विट केले आहे की, आज २०० मीटरमध्ये पुन्हा एक सुवर्ण पदक जिंकलं. टाबोरमध्ये वेळ सुधारत २३.२५ सेकंदमध्ये शर्यत पूर्ण केली. हिमा दासने २ जुलैला पोलँडमध्ये झालेल्या पहिल्या रेसमध्ये २३.६५ सेकंदात विजय मिळवला होता.
हिमा दास ज्या राज्यातून आहे त्या आसाममध्ये सध्या पूर आला आहे. याबाबत देखील तिने चिंता व्यक्त केली आहे. हिमाने पूरग्रस्तांसाठी तिचा अर्धा पगार देण्याची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर, तिने व्यापाऱ्यांना देखील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचं आव्हान केलं आहे. बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार याने देखील आसाममधील पूरग्रस्तांना २ कोटींची आर्थिक मदत दिली आहे.