'आर अश्विनला योग्य वागणूक दिली नाही, रोहित शर्मा म्हणाला...', CSK च्या स्टार खेळाडूचा गौप्यस्फोट

भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असल्याने चेन्नई सुपरकिंग्जच्या स्टार खेळाडूने आश्चर्य व्यक्त केलं आहे. आर अश्विन मागील अनेक काळापासून नाराज होता असंही त्याने सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 20, 2024, 03:00 PM IST
'आर अश्विनला योग्य वागणूक दिली नाही, रोहित शर्मा म्हणाला...', CSK च्या स्टार खेळाडूचा गौप्यस्फोट title=

भारताला मागील अनेक दशकांमध्ये मिळालेल्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आर अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आर अश्विनने अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारताचा दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला योग्य प्रकारे निरोपही देता आला नाही. आपली जाण्याची वेळ आली आहे असं सांगत आर अश्विनने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आर अश्विनच्या तडकाफडकी निर्णयानंतर अनेक चर्चा रंगल्या असून, वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. यादरम्यान चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा माजी फलंदाज सुब्रहमण्यम बद्रिनाथने (Subramaniam Badrinath) आर अश्विन मागील अनेक काळापासून नाराज होता असा खुलासा केला आहे. 

आर अश्विनची निवृत्ती घेण्याची वेळ आणि ज्याप्रकारे घेतली यावरुन बद्रिनाथने आश्चर्य व्यक्त केलं आहे. आर अश्विन पात्र होता तशी वागणूक संघ आणि व्यवस्थापनाने दिली नाही असा आरोपही त्याने केली आहे. 

"मला धक्का बसला आहे. मला प्रामाणिकपणे वाटतं त्याला योग्य वागणूक देण्यात आली नाही. रोहित शर्माने सांगितलं की, पर्थमधील कसोटी सामन्यानंतर त्याला जायचं होतं. वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या आधी खेळवल्याने त्याला निघून जायचं होतं. यावरुन तो नाराज होता हे दिसत आहे," असं बद्रिनाथने स्टार स्पोर्ट्स तामिळशी बोलताना सांगितलं.

'जर माझी गरजच नसेल तर...', आर अश्विनचं निवृत्तीआधी रोहित शर्मासह झालेलं संभाषण उघड

 

"मी मुद्द्याचं आणि महत्त्वाचं सांगत आहे. तामिळनाडूमधील क्रिकेटरसाठी ही मोठी बाब आहे. यामागे अनेक कारणं आहेत. इतर राज्यातील खेळाडूंना चांगल्या संधी मिळतात. पण या सर्वांवर मात करत आर अश्विनने 500 विकेट्स घेतले आणि महान खेळाडू झाला," असंही तो म्हणाला आहे.

आर अश्विनला बाजूला करण्याचाही प्रयत्न झाला, मात्र त्याने प्रत्येक वेळी पुनरागम केलं असाही दावा बद्रीनाथने केला आहे. जेव्हा वॉशिंग्टन सुंदरला संघात त्याच्यापेक्षा जास्त प्राथमिकता देण्यात आली तेव्हा त्याने आता आपली वेळ संपली आहे असं ठरवलं असंही त्याने सांगितलं आहे. 

"त्याला काय सहन करावं लागलं असेल याचा विचार करा. मला वाटतं त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अनेक वेळा त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली," असा दावा बद्रिनाथने केला आहे.

ब्रिस्बेन कसोटी संपल्यानंतर अश्विन संघासोबत थांबलाही नाही आणि त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला पोहोचल्यानंतर, त्याने सांगितले की त्याला त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही.