विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एकदा 'चोकर्स'चा शिक्का, वाचा हा शब्द आला कुठून?

AUS vs SA: आयसीसी विश्वचषकात 2023 स्पर्धेत सेमीफायनच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट राखून पराभव केला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एका चोकर्सचा शिक्का बसला आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 17, 2023, 02:03 PM IST
विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा एकदा 'चोकर्स'चा शिक्का, वाचा हा शब्द आला कुठून? title=

South Afica 'Chokers': आयसीसी विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलियात अंतिम सामना रंगणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा (India beat New Zealand) पराभव केला. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला (Australia beat South Africa) धुळ चारत अंतिम सामन्यात धड मारली. ऑस्ट्रेलियाने चुरशीच्या ठरलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट राखून पराभव केला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेवर पु्न्हा एकाद चोकर्सचा (Chokers) शिक्का बसला आहे. विश्वचषकात चौथ्यांदा सेमीफायनलमध्ये येऊन दक्षिण आफ्रिकेला पराभव स्विकारावा लागला. 

ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये
कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळलेला गेलेला दुसरा सेमीफायनलचा सामना जबरदस्त चुरशीचा झाला. या सामन्यात पहिली फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 212 धावांवर ऑलआऊट झाला. 24 धावांवर 4 विकेट अशी अवस्था असताना डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेनने 5 व्या विकेसाठी 95 धावांची पार्टनरशिप केली. क्लासेन 47 धावांवर बाद झाला, पण मिलरने एकाकी झुंज देत 101 धावांची शतकी खेळी करत संघाला दक्षिण आफ्रिकेला दोनशे धावांचा टप्पा पार करुन दिला. विजयाचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावत पूर्ण केलं. 

दक्षिण आफ्रिका पुन्हा चोकर्स
या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर पुन्हा चोकर्सचा शिक्का बसला आहे. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दमदार कामगिरी केली. नऊ पैकी तब्बल सात सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनल गाठली. क्विंटन डीकॉकने या स्पर्धेत तब्बल 3 शतकं लगावली. याशिवाय वॅन डर दुसाँ, डेव्हिड मिलर अशी भक्कम फलंदाजी दक्षिण आफ्रिकेकडे होती. पण सेमीफायनलमध्ये मिलर वगळता सर्व फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे पुन्हा एका दक्षिण आफ्रिकेच्या नावावर चोकर्सचा शिक्का बसलाय. या शब्दाची सुरुवात 1999 च्या विश्वचषकात झाली. 

असं पडलं चोकर्स नाव
1999 च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिणआफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापाासूनच दक्षिण आफ्रिकेच्या नावावर चोकर्स हा शब्द लागला. मोक्याच्या क्षणी मोठ्या सामन्यात शरणागती पत्करणाच्या सवयीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या नावावर हा शब्द लागला.

17 जून 1999 चा तो दिवस होता. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये खेळत होते. त्यावेळी हे दोन्ही संघ ताकदवार मानले जात. ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करत 213 धावा केल्या. याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरुवात केली. सलामीवीर गॅरी कर्स्टन आणि हर्षल गिब्जने पहिल्या विकेटसाठी 48 धावांची पार्टनरशिप केली. शेन वॉर्नने दोन्ही फलंदाजांना बाद करत आफ्रिकेला मोठा धक्का दिला. या धक्क्यातून दक्षिण आफ्रिका सावरली नाही, एकामागोमाग एक विकेट गेल्या 198 वर 9 विकेट गेल्या. पण कहाणीत ट्विस्ट बाकी होता.

क्लूजनरने लढवला किल्ला
दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर लान्स क्लूजनर खेळपट्टीवर उभा होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिका जिंकण्याची आशा कायम होती. क्लूजनरबरोबर एलन डोनाल्ड मैदानावर होता. दक्षिण आफ्रिकेला 8 चेंडूत जिकण्यासाठी 16 धावांची गरज होती. क्लूजनरने एक सिक्स मारला आणि पुढच्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक स्वत:कडे ठेवला. दक्षिण आफ्रिकेला 6 चेंडूत 9 धावांची गरज होती. शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर क्लूजनरने चौकार मारला. दक्षिण आफ्रिका जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर होती. विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला केवळ एका धावेची गरज होती. क्लूजरने चेंडू टोलवला, पण धाव घेण्याच्या नादात डोनाल्ड रनआऊट झाला आणि सामना ड्रॉ झाला. 

त्यावेळी सुपर ओव्हरचा नियम नसल्याने चांगल्या रनरेटच्या आधारावर ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आलं. या पराभवनंतर दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हटलं जाऊ लागलं. दक्षिण आफ्रिका आतापर्यत 9 वेळा विश्वचषक स्पर्धा खेळली पण एकदाही अंतिम सामन्यात पोहोचू शकली नाही.