दुबई : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2021च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा जेतेपद जिंकलं. याआधी, चेन्नई सुपर किंग्जने 2010, 2011 आणि 2018 मध्ये देखील आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. CSKने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चारही जेतेपदं जिंकली आहेत.
शार्दुल ठाकूरच्या एका ओव्हरने संपूर्ण खेळ फिरवला. एका क्षणी, केकेआरचा संघ कोणत्याही विकेटशिवाय 91 धावांवर पुढे जात असल्याचं दिसत होतं. पण नंतर शार्दुल ठाकूरने केवळ दोन चेंडूमध्ये सामना फिरवला. सामना हातातून निसटताना पाहून धोनीने 11वी ओव्हर शार्दुलला दिली आणि शार्दुलने त्याला अजिबात निराश केलं नाही.
शार्दुल ठाकूरने प्रथम अर्धशतक झळकावणाऱ्या व्यंकटेश अय्यरला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. रवींद्र जडेजाने CSKसाठी पहिली विकेट अय्यरचा शानदार कॅच पकडत मिळवली. यानंतर शार्दुल ठाकूरने नितीश राणाला पहिल्याच चेंडूवर फाफ डु प्लेसिसच्या हाती कॅचआऊट केलं.
शार्दुलने फक्त दोन बॉल्समध्ये मॅच सीएसकेच्या हातात आणून दिली. त्यानंतर केकेआरची मधली फळी पत्त्यांप्रमाणे ढेपाळली. सीएसके 27 धावांनी विजयी झाला. चेन्नई सुपर किंग्सने चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली. केकेआरच्या मधल्या फळीने ओपनर्सच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरलं.