Ind vs Aus: भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची 1-0 ने आघाडी

पहिल्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा धक्का

Updated: Nov 27, 2020, 06:10 PM IST
Ind vs Aus: भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची 1-0 ने आघाडी title=

मुंबई : भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. आधी बॅटींग करत ऑस्ट्रेलियाने भारताला 375 धावांचे लक्ष्य दिले. या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमवत 308 धावा करण्यास सक्षम ठरला. पण ऑस्ट्रेलियाने 66 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि कर्णधार अ‍ॅरॉन फिंच तसेच स्टीव्ह स्मिथने शतक ठोकले. यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 374 धावा केल्या. अशाप्रकारे यजमान संघाने भारतासमोर विजयासाठी 375 धावांचे लक्ष्य दिले.

पांड्या-धवनची मोठी भागीदारी

भारताकडून मयंक अग्रवाल आणि शिखर धवनने डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये 51 धावा केल्या. मात्र, 18 चेंडूत 22 धावा फटकावल्यानंतर मयंक अग्रवाल बाद झाला. त्यानंतर 21 धावांवर विराट कोहली बाद झाला. तर श्रेयस अय्यर 2 रनवर माघारी परतला.

भारताला चौथा धक्का केएल राहुलच्या विकेटने बसला. त्याने 12 रन केले. त्यानंतर हार्दिक पांड्याने केवळ 31 बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले. शिखर धवनने 55 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. शिखर धवन 74 रनवर आऊट झाला. हार्दिक पांड्याने 90 रन्सची शानदार खेळी केली. रवींद्र जडेजाने 25 रन केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियन संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनीही पहिल्या 10 ओव्हरमध्ये विकेट न गमवता 51 धावा जोडल्या. आरोन फिंचने 69 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर संघाने 100 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने त्याच्या कारकीर्दीची 22 वी फिफ्टी पूर्ण केली. 4 चौकारांच्या मदतीने त्याने 54 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

कांगारू संघाला पहिला धक्का 28 व्या ओव्हरमध्ये लागला. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला आऊट केले. वॉर्नर 76 बॉलमध्ये 69 धावांची खेळी करुन बाद झाला. त्याचवेळी कर्णधार आरोन फिंचने 117 बॉलमध्ये आपल्या वनडे कारकिर्दीतले 17 वे शतक पूर्ण केले. तो 114 रनवर आऊट झाला.

ऑस्ट्रेलियन संघाला तिसरा धक्का पहिल्याच चेंडूवर बाद झालेल्या मार्कस स्टोईनिसच्या रूपात लागला. युजवेंद्र चहलने त्याला माघारी पाठवले. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 19 बॉलमध्ये 45 धावांचे तुफानी खेळी केली.

माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही यजमान कांगारू संघासाठी शतक झळकावले. अवघ्या 62 बॉलमध्ये 10 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने त्याने शतक पूर्ण केलं. तो 105 रनवर आऊट झाला.