IND vs NZ: पदार्पणाच्या टेस्टमध्येच जेमिसनचा विक्रम, मायकल क्लार्कशी बरोबरी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली आहे.

Updated: Feb 23, 2020, 08:13 PM IST
IND vs NZ: पदार्पणाच्या टेस्टमध्येच जेमिसनचा विक्रम, मायकल क्लार्कशी बरोबरी

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये १८३ रननी पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये तिसऱ्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर १४४/४ एवढा आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी स्वस्तात आऊट झाल्यानंतर भारतीय बॉलरना न्यूझीलंडला स्वस्तात रोखण्याची संधी होती. न्यूझीलंडची अवस्था २१६/५ अशी झाली होती. पण काईल जेमिसनने खास रेकॉर्ड करुन भारताकडून ही संधी हिरावून घेतली.

दिवसाची सुरुवात २२५/७ अशी केल्यानंतर न्यूझीलंडला फार मोठी आघाडी मिळणार नाही, असं वाटत होतं. पण जेमिसन आणि कॉलिन डि ग्रॅण्डहोम यांनी मिळून ७१ रनची पार्टनरशीप केली आणि भारताचा स्कोअर ३०० रनपर्यंत पोहोचवला. जेमिसनने त्याच्या पहिल्याच टेस्टमध्ये ४५ बॉल खेळून ४४ रनची जलद खेळी केली आणि न्यूझीलंडला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं.

या खेळीदरम्यान जेमिसनने ४ सिक्स मारले आणि टेस्ट मॅचमध्ये नवा रेकॉर्ड केला. टेस्ट क्रिकेटच्या आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये एवढ्या सिक्स मारणारा जेमिसन मायकल क्लार्कसोबत पहिलाच खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनेही आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये ४ सिक्स मारले होते. याचसोबत जेमिसन नवव्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक रन करणारा न्यूझीलंडचा सगळ्यात लहान खेळाडू ठरला आहे.

आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळताना सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्याच टीम साऊदीच्या नावावर आहे. साऊदीने आपल्या पहिल्या टेस्टमध्ये ९ सिक्स लगावले होते. या सगळ्या सिक्स साऊदीने दुसऱ्या इनिंगमध्येच मारल्या होत्या.