India vs Pakistan T20 WC Match Tickets : भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणारा क्रिकेटचा सामना म्हणजे वर्ल्ड कप फायनलपेक्षा कमी महत्त्वाची कधीच नसते. मागील अनेक वर्षांपासून हे दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळलेले नाही. त्यामुळे आयसीसीच्या मालिकेत भिडण्यासाठी दोन्ही संघ नेहमी आतूर असतात. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धांमधील सामने हे तुलनेनं दुर्मिळ असल्याने अशा सामन्यांची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. अशातच आता 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नस्साउ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. त्यामुळे सामना डोळ्यांनी पाहण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, रिसेल बाजारांमध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान वर्ल्डकप स्पर्धेत होणाऱ्या या टी-20 सामन्याच्या तिकीटांची रिलेस मार्केटमधील किंमत ऐकून तुमचं देखील डोकं चक्रावेल.
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी सामान्य श्रेणीसाठी तिकिटाचे दर 14,500 रुपये (भारतीय रुपयांमध्ये) आहेत. स्टँडर्ड प्लस श्रेणीसाठी 24,863 रुपये आणि प्रिमियम श्रेणीसाठी 33,148 रुपये दर आहेत. मात्र, सध्या सर्व तिकिटं विकली गेल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अनेकजण ब्लॅक मार्केटमधून तिकीट घेण्यावर भर देताना दिसत आहेत. रिसेल मार्केटमध्ये आणि ब्लॅक मार्केटमध्ये तिकीटाची किंमत चक्क कोटींच्या घरात पोहोचली आहे. एका तिकिटाची किंमत इथे चक्क 1.84 कोटी रुपये इथंपर्यंत पोहोचली आहे.
न्यूयॉर्कमध्ये थेट सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहत्यांना प्रति व्यक्ती अंदाजे 2500 अमेरिकन डॉलर खर्च करावे लागेल. युएसए टुडेच्या वृत्तानुसार, सामन्याचं एक तिकीट सर्वाधिक 1 लाख 75 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 1.4 कोटी रुपये इतकं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडे वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सामन्याचं तिकिट देखील लाखोंमध्ये विकलं गेलं होतं. या सामन्याचं एक तिकीट चक्क 57 लाखाला विकत गेल्याची नोंद झाली होती.
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.