दिल्लीतल्या प्रदुषणामुळे भारत-बांगलादेशमधली टी-२० संकटात

भारत आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-२० मॅचवर प्रदुषणाचं संकट आहे.

Updated: Nov 3, 2019, 06:57 PM IST
दिल्लीतल्या प्रदुषणामुळे भारत-बांगलादेशमधली टी-२० संकटात title=

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-२० मॅचवर प्रदुषणाचं संकट आहे. आज संध्याकाळी ७ वाजता दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये ही मॅच खेळवण्यात येणार आहे. पण कालपासूनच दिल्लीतली हवा खराब आहे. संपूर्ण शहरात धुकं असल्यामुळे मॅच होणार का नाही? यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

खराब वातावरणामुळे मैदान कर्मचाऱ्यांना काम करणं अशक्य झाल्याचं डीडीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता मॅच होणं वातावरणाच्याच हातात आहे. दुसरीकडे अजूनपर्यंत ही मॅच रद्द करण्यात आलं नसल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्यातरी याबाबत निर्णय घेणं लवकर होईल, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. खराब हवेमुळे रविवारी दिल्लीतली विमानाची उड्डाणंही रद्द करण्यात आली.

सुरुवातीपासूनच या मॅचवर प्रदुषणाचं संकंट होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीचा खासदार गौतम गंभीरने दिल्लीत मॅच खेळवायला विरोध केला होता, पण बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने मात्र मॅच होईल, असं ठाम मत मांडलं होतं. दोन्ही टीमनी प्रदुषणामध्येच सरावही केला. पण मॅच रात्रीची असल्याने खेळाडूंना धुक्यात बॉल पाहायला त्रास होऊ शकतो, त्यामुळे अडचणीत भर पडू शकते.

भारतीय टीम

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर

बांगलादेशची टीम

महमदुल्लाह (कर्णधार), सौम्य सरकार, अबू हैदर, अफिफ हुसैन, मोसाद्देक हुसैन, अमीनुल इस्लाम, लिटन दास, मुशफिकुर रहीम, अराफत सनी ज्युनियर, अल अमीन हुसैन, मोहम्मद नईम, मुस्तफिजुर रहमान, शफीऊल इस्लाम, मोहम्मद मिथून, तैजुल इस्लाम