नेपाळला लिंबू-टिंबू समजणं महागात पडू शकतं! 'हे' 6 खेळाडू टीम इंडियाला देतील धक्का

India Vs Nepal Asia Cup 2023: नेपाळच्या खेळाडूंना हलक्यात घेणं भारताला महागात पडू शकतं. नेपाळच्या 6 खेळाडूंपासून भारताने सावध राहणं गरजेचं आहे. हे खेळाडू कोणते ते पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 4, 2023, 01:27 PM IST
नेपाळला लिंबू-टिंबू समजणं महागात पडू शकतं! 'हे' 6 खेळाडू टीम इंडियाला देतील धक्का title=

India Vs Nepal Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेमधील भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध झाला. मात्र हा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. आज भारत नेपाळविरुद्ध मैदानात उतरणार आहे. खरं तर नेपाळबरोबरच्या सामना भारत सहज जिंकेल असं अनेकांना वाटत आहे. मात्र या लिंबू-टिंबू संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये या संघाने सुरुवातीलाच महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. बाबर आझम आणि इफ्तिखार अहमदने शतकं झळकावून पाकिस्तानची लाज राखली. मात्र नेपाळने पहिल्यांदाच दादा संघाला असा धक्का दिला आहे अशी गोष्ट नाही. अर्थात भारत आणि नेपाळचा संघ पहिल्यांच आमने-सामने येणार आहे. भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळणं हीच नेपाळसाठी मोठी सन्मानाची बाब आहे. मात्र दुसरीकडे भारताला उत्तम कामगिरी करता आली नाही तरीही भारतीय संघाचा आत्मविश्वास डळमळू शकतो.

नेपाळच्या 6 खेळाडूंपासून सावधान

भारताला अनिर्णित सामन्यातून एक गुण मिळाला आहे. तर नेपाळने गुणांचं खातं उघडलेलं नाही. पाकिस्तान 'सुपर-4'साठी पात्र ठरला आहे. म्हणजेच भारताला आजचा सामना 'सुपर-4'मध्ये जाण्यासाठी जिंकावच लागणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तरी भारत 'सुपर-4'साठी पात्र ठरेल. मात्र भारताचा पराभव झाला तर स्पर्धेतून गच्छंती निश्चित आहे. नेपाळच्या खेळाडूंना हलक्यात घेणं भारताला महागात पडू शकतं. नेपाळच्या 6 खेळाडूंपासून भारताने सावध राहणं गरजेचं आहे. हे खेळाडू कोणते ते पाहूयात...

कुशर भुर्तेल

कुशल भुर्तेल हा नेपाळचा सलामीवीर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये शाहीन शाह आफ्रिदीचा 2 उत्तम चौकार लगावले. मात्र त्याला मोठी धावसंख्या उभारता आळी नाही. त्याने 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 986 धावा केल्या असून त्यात 1 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यावर्षी 20 सामन्यांमध्ये 552 धावा केल्या आहेत.

आसिफ शेख

आसिफ शेख हा नेपाळचा दुसरा सलामीवीर आहे. तो एक आक्रमक सलामीवर आणि संघाचा विकेटकीपर आहे. तो सप्टेंबर 2021 पासून नेपाळच्या संघातून खेळतोय. त्याने 41 सामन्यांमध्ये 1187 धावा केल्या आहेत. 2023 त्याने 19 सामन्यांमध्ये 537 धावा केल्या आहेत. तो सध्या उत्तम खेळतोय.

कुशल मल्ला

फिरकी गोलंदाज असलेला कुशल मल्ला हा खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे. मधल्या फळीत तो फलंदाजी करतो. तो उत्तम फिरकी गोलंदाजीही करतो. कुशलने आतापर्यंत 28 सामने खेळले असून त्यामध्ये 632 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 4.63 च्या इकनॉमी रेटने 18 विकेट्सही घेतल्या आहेत. तो आयसीसी मॅन्स प्रीमियर कप 2023 मधील सर्वोत्तम फलंदाज ठरला होता.

गुलशन झा

गुलशन झा हा नेपाळच्या संघातील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. झा याने अनेक सामने नेपाळच्या संघाला जिंकून दिले आहेत. तो उत्तम फटकेबाजी करतो. त्याने 19 डावांमध्ये 33.21 च्या सरासरीने 465 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 67 इतकी आहे. त्याने आतापर्यंत 21 विकेट्स घेतल्या आहेत.

सोमपाल कामी

सोमपाल कामी हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. सोमपाल हा उत्तम गोलंदाज आणि फलंदाजही आहे. नेपाळचा संघ आशिया चषकासाठी पात्र ठरण्यामागे सोमपाल कामीचं मोठं योगदान आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेपाळकडून खेळताना मागील सामन्यात सर्वाधिक म्हणजेच 28 धावा केल्या होत्या. त्याने 37 डावांमध्ये 506 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 65 विकेट्स घेतल्या आहेत.

ललित राजबंशी

ललित राजबंशी हा वेगवान गोलंदाज आहे. सलामीवीरांसाठी ललितला खेळून काढणं आव्हानात्मक ठरु शकतं. मागील 5 वर्षांपासून ललित संघाचा सदस्य आहे. त्याने 22 सामन्यांमध्ये 3.62 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या आहेत. शेवटच्या सामन्यामध्ये पाकिस्तानने 340 धावा केल्या तेव्हा ललितने आपल्या 10 ओव्हरमध्ये केवळ 48 धावा दिलेल्या.