मुंबई: क्रिकेटचा देवमाणूस समजल्या जाणारा सचिन तेंडुलकर मैदानातील प्रत्येक खेळ अत्यंत सीरियस होऊन खेळायचा पण चक्क त्याने पाकिस्तानी खेळाडूला सीरियसली न घेण्याचा दिलेला सल्ला आणि त्यामगचा एक मजेशीर किस्सा देखील समोर आला आहे. सचिन तेंडुलकरने जे सांगितलं ते कोणी ऐकलं नाही असं नाही. त्याचा सल्ला त्याचं म्हणणं टीम इंडियाच नाही तर देशविदेशातील खेळाडू देखील ऐकत होते.
पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर सईद अजमलला सचिन तेंडुलकरने मॅच सीरियसली न घेण्याचा अजब सल्ला दिला होता. सचिननं अशा प्रकारचा सल्ला का दिला असेल असा पटकन विचार मनात येतो. त्यामागे खास कारणंही होतं. पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाला त्याने सामना सीरियसली न घेण्याबाबत सांगितलं होतं.
2014मध्ये एमसीसी आणि रेस्ट वर्ल्ड -11 यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. हा सामना चॅरिटीला फंड गोळा करण्यासाठी खेळवण्यात आला होता. सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू यातमध्ये सहभागी झाले होते. या सामन्या रेस्ट वर्ल्ड 11 संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली.
या सामन्याच्या सुरुवातीलाच सईद अजमलने 4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी 12 ओव्हरमध्ये 68 धावा झाल्या होत्या. त्यावेळी सचिननं अजमलला हा सल्ला दिला. सामना गंभीरतेनं घेऊ नकोस.
क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजमलने यामागचं कारण सांगितलं. 'सचिन तेंडुलकरने त्यावेळी मला सामना सीरियसली न घेण्याचा सल्ला दिला कारण सामना जेवढा जास्त वेळ सुरू राहिल तेवढा जास्त फंड मिळेल असं त्याने सांगितलं होतं. हा सामना चॅरिटीसाठी आहे. हा सामना 6.30 वाजल्याशिवाय संपायला नको असंही त्याने यावेळी मला सांगितलं होतं.'
या सामन्यात युवराज सिंहने शतकी खेळी केली होती. तर त्याला टफ फाइट देण्यासाठी एऱोन फिंच एकटाच पुरुन उरला. त्याने 145 चेंडूमध्ये 181 धावा केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.