FIR against Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कथित आरोपाप्रकरणी दिल्ली पोलिसांत (Delhi Police) एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. भारतीय महिला कुस्तीपटूंच्या (Indian Women Wrestler) तक्रारीनंतर दिल्लीतल्या कनॉट प्लेस पोलीस स्थानकात दोन एफआयआर नोंदवण्यात आल्या. पहिला एफआयआर अल्पवयीन मुलीद्वारे करण्यात आलेल्या आरोपसंदर्भात आहे. याचप्रकरणात पोक्सोअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा एफआयआर महिला कुस्तीपटूंनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणात गंभीर दखल घेण्यात आली आहे.
पोलिसांची सुप्रीम कोर्टात माहिती
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) माहिती दिली होती. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितलं होतं. कुस्तीपटूंच्यावतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी सीलबंद लिफाफ्यात आपलं म्हणणं कोर्टात ठेवलं. यात तक्रारदार अल्पवयीन मुलीला धोका असल्याचं नमुद करण्यात आलंय.
ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया
भारतीय महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर ब्रिजभूषण सिंह यांनी हे प्रकरण सुप्रिम कोर्टात असून कोर्ट जो निर्णय देईल त्याचं आपण स्वागत करु असं म्हटलंय. पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय. पोलिसांच्या तपासात पूर्णपणे सहकार्य करु तसंच कायद्याचं पालन करु असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलंय.
जंतर-मंतरवर आंदोलन
भारताचे आघाडीचे कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटू दिल्लीतल्या जंतरमंतरवर धरणं आंदोलनासाठी बसले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांना सर्व पदांवरुन हटवण्यात यावं आणि त्यांची रवानगी तुरुंगात करावी अशी मागणी कुस्तीपटूंनी केली असून आंदोलनापासून मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधआत अनेक पुरावे आहेत, हे सर्व पुरावे सुप्रीम कोर्टात देऊ कोणत्याही समितीसमोर देणार नाही अशी भूमिकाही भारतीय कुस्तीपटूंनी घेतली आहे. ब्रिजभूषण यांच्यावर महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
खेळाला वाचवायचं असेल तर अशा प्रवृत्तीच्या लोकांना क्रीडा क्षेत्रापासून दूर ठेवायला हवं आणि हे फक्त कुस्तीपूरतं नाही तर इतर सर्वच खेळांबद्दल होणं गरजेचं आहे. देशात खेळाचं भविष्य टिकवायचं असेल तर सर्व खेळाडूंना एकत्र यायला हवं असं आवाहन भारतीय कुस्तीपटूंनी केलं आहे.