मुंबई : भारतीय बॅडमिंटन विश्वात 'फुलराणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायना नेहवाल हिने आणखी एक विक्रम रचला आहे. इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीचं जेतेपद तिच्या नावे करण्यात आलं असून, तिच्याकडे असणाऱ्या जेतेपदांच्या यादीत आणखी एका किताबाची भर पडली आहे. स्पेनची कॅरोलिना मरिन हिच्याविरुद्ध खेळणाऱ्या सायनाला अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच तिच्याकडून चांगलं आव्हान मिळालं होतं. पण, सामन्यात दुखापतीमुळे कॅरोलिनाला माघार घ्यावी लागली. परिणामी सामन्याचं जेतेपद सायनाच्या नावे करण्यात आलं.
ऑलिम्पिक पदक विजेती कॅरोलिना मरिन ही सामन्याच्या सुरुवातीला आघाडीवर होती. चांगली सुरुवात करत तिच्याकडे १०-४ अशी आघाडीही होती. पण, खेळ रंगात आलेल्या असतानाच कॅरोलिना विचित्र प्रकारे पाय मुरगळून पडली आणि तिच्या वेदना चेहऱ्यावरुन स्पष्टपणे दिसत होत्या. त्यानंतरही ती उभी राहिली आणि खेळ सुरु करत एक गुण मिळवला. पण, त्यानंतर मात्र तिला खेळातून माघार घ्यावी लागली.
तिला झालेली दुखापत पाहता अतिशय गंभीर स्वरुपाची असून पुढील काही महिने तिला खेळापासून दूर राहावं लागणार असल्याचं कळत आहे. कॅरोलिनाच्या दुखापतीमुळे सामन्याच्या जेतेपदी सायनाचं नाव घोषित करण्यात आलं. पण, तरीही ज्या पद्धतीने आपली प्रतिस्पर्धी कॅरोलिना हिला खेळातून माघार घ्यावी लागली ते चुकीचं घडल्याचं म्हणत सायनानेती तिच्या दुखापतीवर दु:ख व्यक्त केलं.