ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला गुरुवार ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मॅचसाठी दोन्ही टीमच्या रणनितीबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. सीरिज सुरु होण्याच्या आधीपासूनच भारताचा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध ऑस्ट्रेलियाची टीम कोणती रणनिती वापरणार हे बोललं जात होतं. पण ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचल मार्श यानं फक्त विराटच नाही तर इतर बॅट्समनना आऊट करण्यासाठीही आमच्याकडे रणनिती तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
विराट कोहली हा महान खेळाडू आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी बनवलेल्या रणनितीमध्ये यशस्वी होऊ, असा विश्वास मार्शनं बोलून दाखवला. विराटसोडून आम्ही दुसऱ्या कोणत्याही भारतीय बॅट्समनविरुद्ध रणनिती बनवली नाही तर तो आमचा मूर्खपणा ठरेल, अशी प्रतिक्रिया मार्शनं दिली आहे.
बॉल छेडछाड प्रकरणामुळे बंदी घालण्यात आलेले डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ सध्या ऑस्ट्रेलियाच्या टीमबाहेर आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम कमजोर झाल्याचा दावा केला जातोय. पण यामुळे खेळाडूंनी याकडे संधी म्हणून पाहावं असं वक्तव्य मार्शनं केलं.
अश्विन, जडेजा आणि कुलदीप हे चांगले स्पिनर आहेत पण ऑस्ट्रेलियात भारतीय स्पिनरना चांगली कामगिरी करता आलेली नाही हा इतिहास आहे, हे सांगायला मार्श विसरला नाही.
ऍडलेडच्या मैदानात भारतानं आत्तापर्यंत ११ टेस्ट मॅच खेळल्या. यातल्या एकाच टेस्ट मॅचमध्ये भारताला विजय मिळाला होता. १५ वर्षांपूर्वी राहुल द्रविडचं द्विशतक आणि अजित आगरकरच्या बॉलिंगमुळे या मैदानात भारत जिंकला होता. ऍडलेडमध्ये भारत ७ मॅच हारला आहे तर ३ मॅच ड्रॉ झाल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत ९४ टेस्ट मॅच झाल्या आहेत. यातल्या ४१ मॅच ऑस्ट्रेलियानं आणि २६ मॅच भारतानं जिंकल्या. भारतानं २६ पैकी ५ टेस्ट मॅच ऑस्ट्रेलियात तर उरलेल्या मॅच मायदेशात जिंकल्या.
मागच्या ७० वर्षांमध्ये भारत ११ वेळा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. यातल्या फक्त २ सीरिज भारताला ड्रॉ करता आल्या. पहिले १९८०-८१ मध्ये सुनील गावसकर यांच्या नेतृत्वात आणि २००३-०४ साली गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं सीरिज ड्रॉ केली होती.