मॅंचेस्टर : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा ८९ रनने शानदार विजय झाला. याचबरोबर भारताने वर्ल्ड कपमधली पाकिस्तानविरुद्धची विजयी परंपरा कायम ठेवली. आत्तापर्यंत वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या सगळ्या ७ मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पण या मॅचमध्ये भारताला मोठा धक्का लागला. या मॅचमध्ये बॉलिंग करत असताना फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली.
भुवनेश्वर कुमारच्या मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाल्याचं निदान झालं आहे. भुवनेश्वरने कुमारने पाकिस्तान विरुद्ध फक्त २.४ ओव्हरच बॉलिंग केली. यात त्याने ८ रन दिले. आपल्या स्पेलची तिसरी ओव्हर टाकताना हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला, त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावे लागले.
भुवनेश्वरच्या दुखापतीमुळे त्याच्या तिसऱ्या ओव्हरमधील २ बॉल शिल्लक होते. ती ओव्हर पूर्ण करण्यासाठी विजय शंकरला संधी मिळाली. विजय शंकरने या संधीचे सोने केले. त्याने पहिल्याच बॉलवर इमाम उल हकची विकेट घेतली. यासोबतच विजय शंकरने आपल्या नावावर नव्या रेकॉर्डची नोंद केली. वर्ल्ड कपमध्ये आपल्या पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा विजय शंकर हा पहिलाच भारतीय बॉलर ठरला.
पाकिस्तानविरुद्धची मॅच संपल्यानंतर विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीबाबत माहिती दिली. कोहली म्हणाला, 'भुवनेश्वरला थोडा त्रास होत आहे. तो घसरल्याने त्याच्या या दुखापतीत आधीपेक्षा वाढ झाली आहे. भुवनेश्वरची दुखापत बघता तो पुढच्या २-३ मॅच खेळू शकणार नाही. पण भुवनेश्वर साखळी फेरीतच टीममध्ये कमबॅक करेल.'
भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील काही मॅच खेळणार नाही. त्यामुळे टीममध्ये त्याऐवजी मोहम्मद शमीला संधी देणार असल्याची माहिती विराट कोहीलीने पत्रकार परिषदे दरम्यान दिली. टीम इंडियाची पुढील मॅच अफगाणिस्तान विरुद्ध २२ जूनला होणार आहे.