IPL 2019 : 'चुकीच्या निर्णयांमुळे आरसीबी जेतेपदापासून दूर'

संघाच्या आपयशाविषयी विराट म्हणाला... 

Updated: Mar 17, 2019, 08:23 AM IST
IPL 2019 : 'चुकीच्या निर्णयांमुळे आरसीबी जेतेपदापासून दूर'

बंगळुरू : चुकीच्या निर्णयांमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाला आतापर्यंत एकदाही इंडियन प्रीमियर लीगचं जेतेपद पटकावता आलेलं नाही, अशा आशयाचं वक्तव्य विराट कोहलीने केलं. त्याच्या या वक्तव्यामुळे विराटने संघाला जेतेपद न मिळण्याची खंतच व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आरसीबी अॅप लाँचच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात विराटने हे वक्तव्य केलं. यावेळी आशिष नेहरा आणि संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टनही उपस्थित होते. 

'तुम्ही चुकीचे निर्णय घेतले तर, जिंकणारच नाही. काही मोठ्या सामन्यांच्या वेळी आमची निर्णयक्षमता कमी पडली. ज्या संघाच्या निर्णयक्षमतेमध्ये योग्य तो समतोल असेल तेव्हाच संघ जिंकू शकतो आणि असे संघ आयपीएलचं जेतेपद जिंकलेही आहेत', असं विराट म्हणाला. एकिकडे भारतीय क्रिकेट संघाचं आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात पदार्पण करणारा विराट हा अनेकदा त्याच्या निर्णयासाठीच ओळखला जातो. तर, दुसरीकडे आयपीएलमध्ये मात्र संघाच्या बाबतीतील निर्णयक्षमताच कुठे कमी पडल्याची खंत त्याने व्यक्त केली. त्यामुळे आता येत्या काळात तो यावर काय पाऊलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघातील खेळाडू आणि आयपीएलच्या निमित्ताने या संघाला मिळणाऱ्या लोकप्रियतेविषयीची यावेळ कोहलीने प्रतिक्रिया दिली. 'इतकी वर्षे, तीन वेळा अंतिम सामन्यांपर्यंत पोहोचल्यानंतर, तीन वेळा उपांत्य फेरीत खेळल्यानंतर आणि संघाच्या हाती जेतेपद नसतानाही क्रीडारसिकांचं आयपीएल सुरु होण्यापूर्वी आरसीबीच्या संघाप्रती असणारं प्रेम, उत्सुकता काही कमी झालेली नाही', ही वस्तूस्थिती त्याने मांडली. ज्याबद्दल विराटने आनंद व्यक्त केला. चाहत्यांच्या प्रेमापोटीच हे शक्य असल्याची बाबही त्याने यावेळी मांडली. 

विराटने व्यक्त केलेली खंत, संघातील प्रत्येक खेळाडूवर असणारा त्याचा विश्वास आणि चाहत्यांचं मिळणारं प्रेम या बळावर यंदा आयपीएलच्या हंगामात बंगळुरूचा संघ कुठवर मजल मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. २३ मार्चपासून आयपीएलची दणक्यात सुरुवात होणार आहे. चेन्नईत सुरु होणाऱ्या आयपीएलच्या नव्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोरासमोर उभे ठाकणार आहेत.